कोल्हापुरात लिंगायत जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 01:10 AM2018-01-29T01:10:12+5:302018-01-29T01:10:17+5:30

Lingayat Jansagar in Kolhapur | कोल्हापुरात लिंगायत जनसागर

कोल्हापुरात लिंगायत जनसागर

googlenewsNext


कोल्हापूर : ‘होय, आम्ही लिंगायत आहोत. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता मिळविण्याकरिता तन-मन-धन लावून लढेन; एवढेच नाही तर प्रसंगी प्राण समर्पण करीन,’ अशी शपथ घेत लिंगायत समाजाने रविवारी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला. यामुळे कोल्हापुरातील प्रमुख रस्त्यांवर हातात भगवे ध्वज, डोक्यावर पांढरी टोपी आणि गळ्यात स्कार्फ घातलेला जनसागर उसळल्याचे चित्र दिसत होते. या महामोर्चामुळे दीड वर्षापूर्वी शहरात निघालेल्या मराठा मोर्चाच्या आठवणींना उजाळा मिळाला.
लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी, तसेच अल्पसंख्याकाचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय लिंगायत समाज समिती (कोल्हापूर)ने या राज्यव्यापी महामोर्चाची हाक दिली होती. या मोर्चाला ७७ समाज संघटनांनी पाठिंबा दिला होता; तर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी समाजाच्या व्यासपीठावर हजेरी लावून स्वतंत्र लिंगायत धर्माला मान्यता मिळवून देण्याकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
येथील ऐतिहासिक दसरा चौक येथून दुपारी दीड वाजता महामोर्चाला सुरुवात झाली. तत्पूर्वी सकाळी नऊ वाजल्यापासून समाजातील लोक दसरा चौकाकडे जात होते. यामध्ये शंभर, दोनशे, पाचशेच्या संख्येने येणारे जथ्थेही होते. हलगी, घुमके, कैताळाच्या गजराने मोर्चेकºयांचा उत्साह वाढविला. दुपारी बारा वाजता दसरा चौक गर्दीने फुलून गेला. नंतर हीच गर्दी पूर्वेकडे व्हीनस कॉर्नर, स्टेशन रोडपर्यंत, दक्षिणेकडे स्वयंभू गणेश मंदिरापर्यंत; तर उत्तरेकडे शहाजी महाविद्यालयापर्यंत वाढत गेली. त्यानंतर मात्र अनेकांना दसरा चौकाच्या दिशेने येणेही अशक्य झाले. मोर्चात समाजबांधव नातेवाइकांसह सहकुटुंब, सहपरिवार सहभागी झाले होते. प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर बसवेश्वरांची प्रतिमा असलेली पांढरी टोपी, गळ्यात भगवा स्कार्फ आणि हातात भगवा ध्वज दिसत होता.
मोर्चाला ७७ समाजांनी तसेच संघटनांनी पाठिंबा दिला असला तरी दसरा चौकात ुभारलेल्या बसवपीठावर केवळ प्रातिनिधिक वक्त्यांना बोलण्याची परवानगी देण्यात आली. महापौर स्वाती यवलुजे, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर,आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार सुजित मिणचेकर, आमदार सतेज पाटील, अकाली दलाचे सिमरनजित सिंह मान, माजी आमदार संजयसिंह घाटगे, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, आदींनी त्यांच्या भाषणात लिंगायत समाजाच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दिला. शाहू छत्रपती, कॅप्टन शिवाजीराव महाडकर यांनीही काहीवेळ मोर्चात सहभागी होऊन आपला पाठिंबा दिला. कोरणेश्वर महास्वामी, शिवलिंग शिवाचार्य स्वामींचे प्रतिनिधी बसवेश्वर येरटे, चन्नबसवानंद स्वामी, बसवलिंग पट्टदेवरु, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मुरगाप्पा खुमसे , अकाली दलाचे सिमरनजितसिंग मान यांचीही यावेळी भाषणे झाली. दुपारी दीड वाजता सभेची सांगता होऊन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला. तेथे समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले. या शिष्टमंडळात बसवलिंग पट्टदेवरू महास्वामी, कोरणेश्वर महास्वामी, सरलाताई पाटील, सिमरनजितसिंग मान, बसवेश्वर येरटे, ओमप्रकाश कोयटे, राजशेखर तंबाके, मनोहर पटवारी, विजयकुमार शेटे, आदींचा समावेश होता.
पाठिंबा नव्हे, निवेदन स्वीकारायला आलोय
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाहनांचा ताफा दसरा चौकात येताच संयोजकांचा घोषणा देण्यातील जोश अधिकच वाढला. संयोजकांपैकी एका निवेदकाने ‘जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आपल्या समाजाच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आले आहेत’, असे एकदा सोडून दोन-तीन वेळा माईकवरून जाहीर केले. पालकमंत्र्यांचे या निवेदनाकडे लक्ष जाताच त्यांनी निवेदन करणाºयाला थांबवून ‘ मी इथे पाठिंबा द्यायला आलेलो नाही; तुमच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारायला आलो आहे,’ असे स्पष्ट केले. तेव्हा निवेदकाने त्याची चूक सुधारली.
पंजाबातील सरदारांनी लक्ष वेधून घेतले
विशेष म्हणजे पंजाबातील अमृतसर येथील शिरोमणी अकाली दलाचे सिमरनजितसिंग मान यांच्यासह महेंद्रपाल सिंग, अमृतसिंग, हरपाजन सिंग काश्मिरी, रणजितसिंग सिंगेडा, कुलदीपसिंग पागोवाळ, कर्मसिंग मोईया, परगटसिंग मखू, रमिंदरसिंग जुवेसे, नवदीप सिंग, प्रतपाल सिंग, लालन मोहन, आदी सरदारांनी मोर्चात सहभागी होऊन लक्ष वेधून घेतले.
सांगली, साताºयासह कर्नाटकातील बांधव सहभागी
कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपºयातून समाजबांधव मोर्चासाठी आले होते. यामध्ये शिरोळ, हातकणंगले, गडहिंग्लज येथून मोर्चाला आलेल्यांची संख्या सर्वाधिक होती. याशिवाय शेजारच्या सांगली, सातारा जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातूनही लोक आले होते. परगावांहून वेगवेगळ्या वाहनांतून लोक आले होते. प्रत्येक तालुका, प्रत्येक गावातील लोक गटागटाने मोर्चासाठी आले होते.
मी लिंगायत,
माझा धर्म लिंगायत
शहराच्या विविध भागांतून समाजबांधव जोशपूर्ण घोषणा देत दसरा चौकाकडे जात होते. ‘भारत देशा जय बसवेशा,’ ‘लिंगायतांची हाक, सर्वांची साथ,’ ‘मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत,’ ‘लिंगायत समाजाला संवैधानिक मान्यता मिळालीच पाहिजे,’ ‘लिंगायत धर्माला अल्पसंख्याकाचा दर्जा मिळालाच पाहिजे,’ ‘जगनजोती महात्मा बसवेश्वर महाराज की जय,’ अशा घोषणा मोर्चात दिल्या जात होत्या. घोषणांचा हा गजर मोर्चा संपेपर्यंत अखंडपणे सुरू होता.

Web Title: Lingayat Jansagar in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.