जनगणनेमध्ये ‘लिंगायत’ धर्म लिहिणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:43 AM2021-02-06T04:43:45+5:302021-02-06T04:43:45+5:30

कोल्हापूर : ‘मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत’ अशी घोषणा देत लवकरच होणाऱ्या जनगणनेमध्ये आम्ही आमचा धर्म फक्त ‘लिंगायत’ लिहिणार, ...

Lingayat religion will be written in the census | जनगणनेमध्ये ‘लिंगायत’ धर्म लिहिणार

जनगणनेमध्ये ‘लिंगायत’ धर्म लिहिणार

Next

कोल्हापूर : ‘मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत’ अशी घोषणा देत लवकरच होणाऱ्या जनगणनेमध्ये आम्ही आमचा धर्म फक्त ‘लिंगायत’ लिहिणार, असा निर्धार शुक्रवारी कोल्हापूर लिंगायत समाज संस्थेच्या प्रबोधन मेळाव्यात करण्यात आला. याबाबत गावोगावी जाऊन लिंगायत समाजातील बांधव-भगिनींचे प्रबोधन करण्याचा ठराव झाला.

दसरा चौकातील चित्रदुर्ग मठातील या मेळाव्यास जागतिक लिंगायत महासभेचे बेळगावचे अध्यक्ष शंकर गुड्स, ॲड. शिवानंद हैबतपुरे, माजी आ. प्रकाश शेंडगे, कोल्हापूर लिंगायत समाज संस्थेच्या खजिनदार सरलाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आमचा संपूर्ण लिंगायत समाज हा पूर्वीपासून स्वतंत्र लिंगायत धर्म आहे. फक्त आमची त्याबाबतची नोंद काढण्यात आली. ती नोंद पुन्हा करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लवकरच होणाऱ्या जनगणनेमध्ये सर्व लिंगायत समाज धर्माची नोंद करण्यासाठी सात क्रमांकाच्या कॉलममध्ये ‘लिंगायत’ असे लिहिणार आहे. त्याबाबतचा ठराव या प्रबोधन मेळाव्यात एकमताने करण्यात आला. आपण पूर्वीपासून लिंगायत कसे आहोत. आपला धर्म स्वतंत्र कसा आहे. याबाबत कागदोपत्री पुराव्याच्या माध्यमातून लिंगायत समाजातील बांधव-भगिनींचे गावोगावी जाऊन आम्ही प्रबोधन करणार असल्याचे सरलाताई पाटील यांनी सांगितले. जनगणनेचा मुद्दा राजकीय क्षेत्रासह सामाजिक, धार्मिक, आर्थिक, साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे. त्यामुळे एक मोठा लढा आपल्याला द्यावयाचा आहे. त्यासाठी समाजामध्ये जाऊन आपण ‘मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत’ हे सांगत त्यांचे प्रबोधन करूया असे आवाहन ॲड. शिवानंद हैबतपुरे यांनी केले. या लढ्यात आम्ही लिंगायत समाजासोबत असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. शंकर गुड्स यांच्या हस्ते जागतिक लिंगायत महासभेच्या कोल्हापूर शाखेचे उद्घाटन करण्यात आले. जागतिक लिंगायत महासभा हे लिंगायत समाजाला न्याय मिळवून देण्यासह बसव धर्माचा प्रचार-प्रसार करणारे संघटन आहे. कोल्हापूरप्रमाणे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या महासभेच्या शाखांची सुरुवात करून सर्वांनी एकोप्याने काम करूया, असे आवाहन गुड्स यांनी केले. राजशेखर तंबाके, शिवाजी माळी, अभिषेक मिठारी यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास प्रदीप वाली, मिलिंद साखरपे, चंद्रशेखर बटकडली, विलास आंबोळे, सर्जेराव विभुते, नीळकंठ मुगुळखोड, आदींसह कोल्हापूर, सांगली, उदगीर, बेळगाव येथील लिंगायत समाज बांधव उपस्थित होते. कोल्हापूर लिंगायत समाज संस्थेचे अध्यक्ष बाबूराव तारळी यांनी प्रास्ताविक केले. यश आंबोळे यांनी सूत्रसंचालन केले, तर स्वप्नील जाबशेट्टी यांनी आभार मानले.

Web Title: Lingayat religion will be written in the census

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.