बालविवाह प्रकरणी लिंगनूरच्या पतीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 01:24 PM2020-09-12T13:24:03+5:302020-09-12T13:26:20+5:30
इचलकरंजीतील बालविवाह करून दिलेल्या सख्ख्या बहिणींपैकी खटाव लिंगनूर (ता. मिरज) येथील अल्पवयीन मुलीच्या पतीस मिरज ग्रामीण पोलिसांनी सोमवारी (दि. ७) अटक केली असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
कोल्हापूर : इचलकरंजीतील बालविवाह करून दिलेल्या सख्ख्या बहिणींपैकी खटाव लिंगनूर (ता. मिरज) येथील अल्पवयीन मुलीच्या पतीस मिरज ग्रामीण पोलिसांनी सोमवारी (दि. ७) अटक केली असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
मुलीचे वडील आणि आजोबांचाही हे लग्न लावून देण्यात सहभाग असल्याने त्यांचाही पोलीस शोध घेत असल्याचे तपास अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर यांनी लोकमतला सांगितले.
या विवाहास कारणीभूत ठरल्याप्रकरणी २८ ऑगस्टला पती व वडिलांसह तिघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसांत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ (पोक्सो) अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी शिवाजीनगर इचलकरंजी पोलिसांत मूळ गुन्हा दाखल आहे.
पीडित अल्पवयीन असतानाही लग्न लावल्याची तक्रार कोल्हापुरातील अवनि संस्थेच्या प्रमुख अनुराधा भोसले यांनी दिली आहे. या प्रकरणी सचिन अर्जुन माने (रा. खटाव लिंगनूर, ता. मिरज) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने २२ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.
मूळच्या इचलकरंजीच्या १५ व १३ वर्षांच्या या मुली वडिलांकडून छळ होतो म्हणून अवनि संस्थेत दाखल झाल्या होत्या. त्यांतील एका मुलीचे लिंगनूर येथे व दुसऱ्या मुलीचे खोतनट्टी (ता. अथणी) येथे वडिलांनीच लग्न लावून दिल्याची तक्रार आहे. लिंगनूर येथील मुलीची गेल्या महिन्यात प्रसूतीही झाली आहे. तिला मुलासह बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात येणार आहे.
खोतनट्टी येथील विवाह झालेल्या अल्पवयीन मुलीस बेळगावच्या बालकल्याण समितीने ताब्यात घेतले असल्याचे समजते. तिलाही लवकरच बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली; परंतु कोल्हापूरच्या समिती सदस्यांनी त्याला दुजोरा दिला नाही.
मुलगा वडिलांसमवेतच...
या दोन्ही मुलींना धाकटा भाऊ आहे. तो वडिलांसोबत इचलकरंजी येथे राहतो. जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सागर दाते यांनी त्याची भेट घेतली; परंतु त्याने आपण वडिलांसमवेतच राहणार असल्याचे लेखी लिहून दिले आहे. तशी माहिती दाते यांनी समिती व इचलकरंजी पोलिसांना दिली. कोणतेही मूल त्याच्या आईवडिलांसमवेत राहत असल्यास त्यालाच प्राधान्य दिले जाते.