मद्य घरपोच पार्सल सुविधा फक्त दुपारी चारपर्यंतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:29 AM2021-06-09T04:29:06+5:302021-06-09T04:29:06+5:30
कोल्हापूर : कोरोनाचा कहर कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल करून अत्यावश्यक सेवेतील आस्थापना उघडी ठेवण्याची वेळ वाढवून ...
कोल्हापूर : कोरोनाचा कहर कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल करून अत्यावश्यक सेवेतील आस्थापना उघडी ठेवण्याची वेळ वाढवून दिली. पण मद्य विक्री दुकानातून पार्सल देण्याची वेळ मात्र कमी केली आहे. तर शनिवारी व रविवारी मात्र पूर्ण दिवस पार्सल सुविधा पूर्णपणे बंद ठेवण्यात येत आहे. यामुळे मद्य व्यावसायिकातून नाराजी व्यक्त होत आहे.
कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने दि. १४ एप्रिलपासून कडक निर्बध घातले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवाव्यतिरिक्त सर्वच आस्थापना बंद राहिल्या. तर प्रारंभी मद्य विक्रीचीही दुकाने पूर्णपणे बंद ठेवली होती. पण मे महिन्यात टप्प्याटप्प्याने मद्य पार्सल सेवा सुरू करण्याच्या वेळेत दोनवेळा बदल करण्यात आला. रविवारपर्यत थेट दुकानातून मद्य विक्री बंद असली तरीही सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत मद्याची घरपोच पार्सल सेवा सुरू करण्याची मुभा प्रशासनाने दिली होती. सद्या जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी होत असल्याचे निदर्शनास आल्याने सोमवारपासून अत्यावश्यक सेवेतील सर्व आस्थापना सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे प्रशासनाने आदेश दिले असतानाच दिवसभर मद्य विक्रीची घरपोच पार्सल सेवेची मात्र वेळ कमी केली आहे. सोमवारपासून ही वेळ सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत केली. त्याशिवाय शनिवार, रविवारी ही सुविधा पूर्णपणे बंद ठेवण्याचेही आदेश प्रशासनाने काढले आहे. त्यामुळे मद्य व्यावसायिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मद्य पार्सल सुविधा वेळेबाबत आज बैठक
गेले पंधरा दिवस दिवसभर घरपोच मद्य पार्सल सुविधा सुरू होती, ही वेळ कमी केल्याने मद्य व्यावसायिकातून नाराजी व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर वेळ वाढवण्याबाबत विचारविनियम करण्यासाठी आज, मंगळवारी सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, मद्य व्यावसायिक यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होत आहे.