Kolhapur: दारू गोव्याची, लेबल एमपीचे; ४३ लाखांचा साठा केला जप्त, गुजरातच्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:20 IST2025-04-16T12:19:35+5:302025-04-16T12:20:10+5:30
गगनबावडा मार्गावर आडूर येथे कारवाई

Kolhapur: दारू गोव्याची, लेबल एमपीचे; ४३ लाखांचा साठा केला जप्त, गुजरातच्या दोघांना अटक
कोल्हापूर : गोव्यातून मध्य प्रदेशकडे ४३ लाख २० हजारांची बेकायदेशीर दारू घेऊन जाणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडून ट्रकचालकासह दोघांना अटक केली.
साहिदभाई दाऊदभाई खलिफा (वय ४६, रा. कनभा, ता. कडधन, जि. बडोदा, गुजरात) आणि विक्रमभाई मानसिंग बारिया (३४, रा. कालिया फालिया मोती, देवगडबारिया, गुजरात) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. गगनबावडा मार्गावर आडूर गावच्या हद्दीत मंगळवारी (दि. १५) पहाटे ही कारवाई केली. दारू आणि ट्रक असा ५६ लाखांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.
दारूची अवैध वाहतूक करणारा ट्रक गगनबावडामार्गे कोल्हापुरात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक एकला मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक सदानंद मस्करे यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे गगनबावडा मार्गावर सापळा रचला. पथकाने पावणेसहाच्या सुमारास आडूर गावच्या हद्दीत एका रोपवाटिकेजवळ संशयास्पद ट्रक (जीजे १७ एक्स एक्स ३४६१) अडवला.
झडती घेतली असता ट्रकमध्ये विदेशी दारूचे ३६०० बॉक्स आढळले. मध्य प्रदेशमध्ये उत्पादित केल्याचे लेबल बाटल्यांवर लावलेला सर्व दारूसाठा पथकाने जप्त केला. ४३ लाख २० हजार रुपयांची दारू आणि १३ लाखांचा ट्रक असा ५६ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करून पथकाने ट्रकचालक साहिदभाई खलिफा आणि त्याचा साथीदार विक्रमभाई बारिया यांना अटक केली.
अटकेतील संशयितांची अधिक चौकशी सुरू असल्याचे अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी सांगितले. उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या सूचनेनुसार निरीक्षक मस्करे, दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे, अभयकुमार साबळे, जवान विलास पोवार, सचिन लोंढे, धीरज पांढरे, विशाल भोई, प्रसाद माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
निर्मिती गोव्यात; लेबल मध्य प्रदेशचे
अटकेतील दोन्ही संशयितांनी गोव्यातून दारू आणल्याची कबुली दिली आहे. मात्र, त्यावर मध्य प्रदेशात उत्पादित केलेली दारू असे लेबल आढळले. त्यावरून मध्य प्रदेशातील विक्रेत्याने ऑर्डर देऊन गोव्यातून दारू खरेदी केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. प्रथमच गोवा बनावटीच्या दारूवर मध्य प्रदेशचे लेबल आढळल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी दिली.
तस्करीची मोठी साखळी
अटकेतील दोघांना महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर दारूचा साठा मिळाला. हा साठा गुजरातपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तींकडून दारू पुढे मध्य प्रदेशात पाठवली जाणार होती, अशी माहिती अटकेतील संशयितांकडून मिळाली. त्यावरून तस्करीचे आंतरराज्यीय रॅकेट सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे.