Kolhapur Crime: तोतया कर्मचाऱ्याला अधिकाऱ्यांचे बळ?, दारू तस्करीतील सूत्रधार नामानिराळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 12:22 IST2025-03-24T12:21:37+5:302025-03-24T12:22:00+5:30

पाठीराख्यांचा शोध गरजेचा

Liquor smuggler Nitin Dilip Dhere arrested by state excise department officials | Kolhapur Crime: तोतया कर्मचाऱ्याला अधिकाऱ्यांचे बळ?, दारू तस्करीतील सूत्रधार नामानिराळे

Kolhapur Crime: तोतया कर्मचाऱ्याला अधिकाऱ्यांचे बळ?, दारू तस्करीतील सूत्रधार नामानिराळे

कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शासकीय गणवेशात अंबर दिव्याच्या अलिशान कारमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा नितीन दिलीप ढेरे (वय ३३, रा. जाधववाडी, कोल्हापूर) हा या गुन्ह्यातील हिमनगाचे टोक आहे. त्याला पाठबळ देणारे खरे अधिकारी आणि तस्करीचे सूत्रधार नामानिराळेच आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे आणि ठोस कारवाई करण्याचे धाडस राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवावे लागणार आहे.

तोतया कर्मचारी नितीन ढेरे याने गेल्या दहा वर्षांपासून कोल्हापुरातील काही शासकीय विभागात अधिकाऱ्यांकडे खासगी चालक म्हणून काम केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांकडेही तो काम करीत होता. यातूनच त्याला दारू तस्करीच्या साखळीची माहिती मिळाली. राज्याच्या आणि जिल्ह्यांच्या तपासणी नाक्यांवर शासकीय वाहनांची तपासणी होत नाही.

हीच बाब लक्षात घेऊन त्याने तस्करीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याची कार असल्याचा बनाव केला. त्यासाठी तो स्वत: तोतया कर्मचारी बनला. पण, या गुन्ह्यात त्याला आणखी जणांचे साहाय्य झाल्याची शक्यता आहे. त्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याचा शासकीय गणवेश कोणाकडून आणला? दंडावर लावलेली अक्षरे त्याला कुठे मिळाली? नेमप्लेट आणि बॅच कुठे तयार केला? अंबर दिवा कुठे मिळाला? सर्व साहित्याची जुळवाजुळव आणि तस्करीचा कट त्याने कधी रचला? याचा उलगडा करण्याचे काम वरिष्ठ अधिकाऱ्यांना करावे लागणार आहे.

त्याचा सहकारी सैन्यातील सेवानिवृत्त जवान शिवाजी धायगुडे याचाही गुन्ह्यातील सहभाग अधिकाऱ्यांना शोधावा लागणार आहे. या दोघांना आणखी काही जणांनी मदत केल्याची शक्यता आहेत. त्यांचा शोध घेऊन तस्करीचा उलगडा करण्याचे आव्हान अधिकाऱ्यांसमोर आहे.

दारूसाठा कोणाला पाठवायचा होता?

ढेरे आणि धायगुडे यांनी आणलेली अडीच लाखांची दारू पुढे कोणाला पाठवली जात होती? यांनी गोव्यातून कोणाकडून दारू आणली? जप्त केलेल्या दुसऱ्या कारचा चालक कोण? जप्त केलेल्या दोन्ही कारचे मालक कोण आहेत? याची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.

यांनी केली कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक संजय शीलवंत, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, जवान देवेंद्र पाटील, आशिष पोवार, सुशांत पाटील, आदर्श धुमाळ, राहुल गुरव यांच्या पथकाने कारवाई केली.

Web Title: Liquor smuggler Nitin Dilip Dhere arrested by state excise department officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.