Kolhapur: कारला अंबर दिवा, राज्य उत्पादन शुल्कच्या शासकीय गणवेशात दारूची तस्करी; सेवानिवृत्त जवानासह एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 11:55 IST2025-03-24T11:54:55+5:302025-03-24T11:55:17+5:30
पथकाला धक्का

Kolhapur: कारला अंबर दिवा, राज्य उत्पादन शुल्कच्या शासकीय गणवेशात दारूची तस्करी; सेवानिवृत्त जवानासह एकास अटक
कोल्हापूर : अलिशान कारला अंबर दिवा लावून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याच्या शासकीय गणवेशात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा तोतया कर्मचारी आणि सैन्य दलातील सेवानिवृत्त जवानास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अटक केली.
तोतया कर्मचारी नितीन दिलीप ढेरे (वय ३३, रा. जाधववाडी, कोल्हापूर) आणि सेवानिवृत्त जवान शिवाजी आनंदा धायगुडे (५७, रा. अंदोरी, ता. खंडाळा, जि. सातारा) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. पथकाने त्यांच्याकडून अडीच लाखांची दारू, २५ लाखांची दोन वाहने, मोबाइल असा एकूण २७ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. २३) पहाटे नेसरी ते गडहिंग्लज मार्गावर महागावच्या हद्दीत केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदगड मार्गे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याचे गडहिंग्लज येथील भरारी पथकाला समजले होते. त्यानुसार गडहिंग्लज आणि कोल्हापुरातील भरारी पथकाने रविवारी मध्यरात्री नेसरी ते गडहिंग्लज मार्गावर गस्त सुरू केली.
पहाटे सव्वातीनच्या सुमारास महागावच्या हद्दीत कामत ओढ्याजवळ त्यांना रस्त्याकडेला थांबलेल्या दोन कार दिसल्या. थांबून चौकशी केली असता, त्यावरील एका कारवर अंबर दिवा दिसला. त्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शासकीय गणवेशात नितीन ढेरे हा चालक म्हणून काम करीत होता. तर, शिवाजी धायगुडे हा शेजारच्या सिटवर बसला होता. दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन कारची झडती घेतली असता, पथकाला गोवा बनावटीच्या दारूचे ३६ बॉक्स मिळाले.
वाचा- तोतया कर्मचाऱ्याला अधिकाऱ्यांचे बळ?, दारू तस्करीतील सूत्रधार नामानिराळे
पथकाला धक्का
अंबर दिवा लावलेल्या अलिशान कारमधून दारूची तस्करी करणारा चालक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गणवेशात असल्याचे पाहून कारवाई करणाऱ्या पथकाला धक्का बसला. त्याच्याकडे खाकी वर्दी होती. दंडावर विभागाची अक्षरे लावलेली होती. छातीवर नेमप्लेट होती. पोलिसांची टोपीही होती. कारवर अंबर दिवा होता. दारू तस्करीसाठी लढवलेली शक्कल पाहून भरारी पथक अवाक झाले.
तोतया कर्मचारी खऱ्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात?
अटकेतील तोतया कर्मचारी नितीन ढेरे हा कोल्हापुरातील विविध शासकीय विभागातील अधिकाऱ्यांकडे खासगी चालक म्हणून गेल्या दहा वर्षांपासून काम करीत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकाऱ्यांकडेही त्याने काम केले आहे. त्यामुळेच त्याला शासकीय गणवेशाचे बारकावे माहिती झाल्याची चर्चा आहे.