पात्र-अपात्र उमेदवारांची यादी दोन दिवसांत जाहीर करणार; कुलसचिवांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 01:18 PM2019-11-29T13:18:01+5:302019-11-29T13:21:41+5:30
आंतरविद्याशाखा या चार अधिष्ठाता, क्रीडा अधिविभागाचे संचालक आाणि इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटरच्या संचालक नियुक्तीची प्रक्रिया एकत्रितपणे सुरू करण्यात आली. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी विद्यापीठातील काही अधिकारी आणि कर्मचारी गेले होते.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्यापरीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक, चार अधिष्ठाता आणि दोन संचालकांच्या निवड प्रक्रिया सुरू आहे. त्यातील पात्र-अपात्र उमेदवारांची यादी दोन दिवसांत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे, असे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी गुरुवारी सांगितले.
परीक्षा मंडळाचे संचालक, अधिष्ठाता यांच्या निवडीला होत असलेल्या विलंबाकडे ‘लोकमत’ने गुरुवारी ‘परीक्षा मंडळ संचालकपद अर्जांची छाननी सुरूच’ या वृत्तातून लक्ष वेधले. त्यावर कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी सांगितले की, परीक्षा मंडळाच्या संचालकपदासह मानव्यविद्या, वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान आणि अभियांत्रिकी, आंतरविद्याशाखा या चार अधिष्ठाता, क्रीडा अधिविभागाचे संचालक आाणि इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटरच्या संचालक नियुक्तीची प्रक्रिया एकत्रितपणे सुरू करण्यात आली. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी विद्यापीठातील काही अधिकारी आणि कर्मचारी गेले होते.
अपुरे मनुष्यबळ राहिल्याने निवड प्रक्रियेची गती मंदावली होती. ही प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. संचालक, अधिष्ठाता आणि समन्वयक पदासाठी दाखल झालेल्या अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या दोन दिवसांत संबंधित पदांसाठी पात्र आणि अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. त्यानंतर मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. निवड प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.