शेतकरी आंदोलनास साहित्यिकांचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 03:02 PM2020-12-03T15:02:51+5:302020-12-03T15:06:48+5:30
Farmer strike, literature, kolhapurnews केंद्र सरकारने केलेल्या तीन नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थानमधील शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिकांनी पाठिंबा दिला आहे. महेश एलकुंचवार, राजन गवस, रा.रं बोराडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे हा पाठिंबा जाहीर केला आहे.
कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेल्या तीन नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थानमधील शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिकांनी पाठिंबा दिला आहे. महेश एलकुंचवार, राजन गवस, रा.रं बोराडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे हा पाठिंबा जाहीर केला आहे.
पत्रकात म्हटले आहे, सुरुवातीला आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला. कडाक्याच्या थंडीतही पाण्याचे फवारे, अश्रुधूर आणि लाठीहल्ला करत सरकारने अमानुषपणे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तरीही निर्धाराच्या जोरावर शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मुळातच देशभरातल्या शेतकऱ्यांच्या मतांचा विचार न करता, त्यांना विश्वासात न घेता, न जुमानता मोदी सरकारने ही विधेयके मंजूर केली.
या कायद्यामुळे करार शेतीच्या माध्यमातून बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरतील आणि जमिनीच्या तुकड्यावर श्रम करत गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांना हद्दपार करतील, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. त्याकडे साफ दुर्लक्ष करून सत्तेच्या बळावर शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणे हे केवळ अमानुषच नव्हे तर निषेधार्ह आहे.
सरकारने तातडीने या शेतकऱ्यांशी संवाद साधावा. महात्मा जोतीराव फुले यांच्यापासून क्रांतिसिंह नाना पाटलांपर्यंत अनेक धुरिणांनी याच मातीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढे दिले. त्यामुळे आम्ही आज दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत ठामपणे राहणे हे कर्तव्य समजतो.
यांनी दिला पाठिंबा
या पाठिंबा देणाऱ्यांमध्ये महेश एलकुंचवार, राजन गवस, रा. रं. बोराडे, तारा भवाळकर, नंदा खरे, वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, भास्कर चंदनशिव, रंगनाथ पठारे, चंद्रकांत पाटील, इंद्रजित भालेराव, प्रफुल्ल शिलेदार , प्रमोद मुनघाटे, उल्का महाजन, सुरेखा दळवी, जयंत पवार, कृष्णात खोत, आसाराम लोमटे, प्रवीण बांदेकर, अतुल देऊळगावकर, नारायण कुळकर्णी-कवठेकर, आनंद विंगकर, बालाजी सुतार, अजय कांडर, संदेश भंडारे, संजीव चांदोरकर, अरुणा सबाने, नंदकुमार मोरे, गोविंद काजरेकर, संदीप जगदाळे, प्रसाद कुमठेकर यांचा समावेश आहे.