साहित्यिकांनी लेखनीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी घातली साद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 12:24 PM2023-06-05T12:24:09+5:302023-06-05T12:25:47+5:30

कोल्हापुरात पार पडले पहिले नांगरट साहित्य संमेलन

Literary writers should read the questions of farmers from writing says Veteran poet Vitthal Wagh | साहित्यिकांनी लेखनीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी घातली साद

साहित्यिकांनी लेखनीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी घातली साद

googlenewsNext

कोल्हापूर : स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या कोणत्याच राज्यकर्त्यांनी देशातील गावखेड्यांतील हातांना रोजगार उपलब्ध केला नाही, त्यामुळे गावे ओस पडत आहेत. या भूमीची, मातीची, बळीराजाची राज्यकर्त्यांनी कधीच कदर केली नाही. मात्र, साहित्यिकांनी तरी लेखणीची माध्यमातून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, अशी साद ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी साहित्यिकांना घातली.

स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवार सामाजिक विकास व संशोधन संस्था यांच्या वतीने कोल्हापुरात रविवारी (दि.४) आयोजित केलेल्या राज्यातील पहिल्या नांगरट साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून वाघ बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या भाषा भवनातील वि. स. खांडेकर सभागृहात आयोजित या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते नांगराचा फाळ व खिलार बैलजोडीचे पूजन करून करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार वामनराव चटप व पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना शेतकरी संघटनेच्या वतीने स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. माजी खासदार व संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

ज्ञानेश्वरांनी कित्येक शतकांपूर्वी येथील शेतकऱ्यांची व्यथा, त्यांचे योगदान ओवीतून मांडले. पण, कोणत्याच सत्ताधाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. पाणी हेच येथील शेतकरी आत्महत्येचे मूळ कारण आहे. त्यामुळे हा प्रश्न पहिल्यांदा सोडविणे गरजेचे आहे. देशातील अर्थव्यवस्थेत सर्वाधिक वाटा कृषी क्षेत्राचा असूनही तो घटकच का बेदखल केला जात आहे, असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला.

स्वातंत्र्यानंतर खेड्यात रोजगार,सुविधा देण्यात राज्यकर्ते अपयशी ठरले. त्यामुळेच गावाकडची मुले शहराची वाट धरत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आपल्या अनेक कवितांच्या पंक्तीतून त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना सरकारच्या धाेरणांचेही वाभाढे काढले.

रामदास फुटाणे म्हणाले, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. त्या प्रश्नांना न्याय द्यायचा असेल तर जात-पात-धर्म याच्या पलीकडे जाऊन भूमिका घ्यावी लागेल. साहित्यिकांनी आता लेखणीचा नांगर करून शेतकऱ्यांचे प्रश्न साहित्यातून मांडायला हवेत. इंडिया आणि भारत यांची तुलना करत त्यांनी भारत सरपटत सरपटत आपले अस्तित्व शोधत असल्याची खंत व्यक्त केली. दुधाचे दर, शेतीमालाला हमीभाव यावरील वात्रटिकेतून त्यांनी सरकारी धोरणांवर आसूड ओढले.

डॉ. जाधव म्हणाले, सहकारामुळे ग्रामीण भागाचा चेहरा बदलला, मात्र, यात स्वाहाकार घुसल्यानेच येथील अर्थव्यवस्था ढासळली. दरम्यान, ओडिशा येथील रेल्वे अपघात, किसान आंदोलन व शेतकरी आत्महत्येमधील मृतांना श्रध्दांजली वाहण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी स्वागत केले. किरण पाटील व स्वाती शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. जयकुमार कोले यांनी आभार मानले.

Web Title: Literary writers should read the questions of farmers from writing says Veteran poet Vitthal Wagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.