‘साहित्य’ क्रांती घडविणारे माध्यम
By admin | Published: February 11, 2015 11:43 PM2015-02-11T23:43:57+5:302015-02-12T00:26:49+5:30
राजा शिरगुप्पे : चिंचवाड येथे सहावे ग्रामीण युवा मराठा साहित्य संमेलन
गांधीनगर : लेखन किंवा साहित्य हे आपल्याला रक्ताशिवाय क्रांती घडविण्यासाठी मिळालेले माध्यम आहे. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून हे हत्यार शोषितांच्या व वंचितांच्या हातात जाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे यांनी केले. ते चिंचवाड (ता. करवीर) येथे सहाव्या ग्रामीण युवा मराठा साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षपदावरून बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत, अॅड. गोविंदराव पानसरे यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.पानसरे म्हणाले, साहित्य आणि सत्य यांच्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण होतात. सत्य, आणि साहित्याची भूमिका काय असावी, हा प्रश्न आहे. केवळ एकमत किंवा एक विचार दृष्टिकोन यांचा प्रसार आणि प्रचार करून स्वतंत्र विचाराला पायबंद घालणे हे आपण नैतिक मानतो का? स्वागताध्यक्ष दीपक मगदूम, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील ‘जितो’चे अध्यक्ष नेमिचंद संघवी, सागर चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामीण कथाकार शंकर पाटील, कविवर्य आबा पाटील, उपप्राचार्य मनोहर परीट, वैशाली पाटील, संतोष माने व सनतकुमार पाटील यांचा गौरव झाला. तसेच कमल पाटील लिखित ‘वेलीवरचे फुल’ व ‘मोहाचे जाळे’ या नाट्य एकांकिका प्रकाशित झाल्या. दुपारच्या सत्रात शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी यांनी ‘आसुही हसले खुदुखुदु’ याचे सादरीकण केले. काव्यसंध्याच्या सत्रात संमेलनाध्यक्ष कवी बाळासोा शेटे यांच्या अध्यक्षतेखालील कवी संमेलनात आबा पाटील, संजय सौंदलगे, के. ए. मगदूम, उमेश सुतार, शर्मिष्ठा पाटील, आदी कवी सहभागी झाले होते. रात्री सृजनशक्ती बालविकास मंदिर या शाळेच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. एस. डी. पाटील यांनी प्रास्ताविक, तर व्ही. डी. देसाई, सीमा बोरगावे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी चिंतामणी मगदूम, अंकित सुतार, सचिव नयना पाटील, सुनीता पाटील, आप्पासोा पाटील, रावसोा खोत, श्रेणिक पाटील, आर. ए. चौगुले, के. ए. मगदूम, मुकुंद मांडरेकर, आदी उपस्थित होते.