विहिरीत पडलेल्या गव्यांच्या कळपास जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 01:02 AM2018-04-30T01:02:03+5:302018-04-30T01:02:03+5:30
गगनबावडा : भूतलवाडी पैकी बुवाचीवाडी (ता. गगनबावडा) येथील एका शेतातील विहिरीमध्ये पडलेल्या गव्यांच्या कळपाला वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. चौवीस तासांपेक्षा जास्तकाळ गव्यांना पाण्यात काढावे लागले.
बुवाचीवाडी येथील विठ्ठल भूतल यांच्या शेतामध्ये विहीर आहे. या विहिरीवर शनिवारी मध्यरात्री गव्यांचा कळप पाणी पिण्यासाठी आला होता. यावेळी अचानकपणे पाच गवे विहिरीत कोसळले. विठ्ठल भूतल हे रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या विहिरीवरील विद्युत मोटर सुरू करण्यासाठी आले होते.
यावेळी हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. याची वर्दी वनविभागाला मिळताच गगनबावड्याचे वन क्षेत्रपाल पी. एस. पाटील यांनी एकूण १५ कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर मातीचा गाळ असल्याने त्यामध्ये हे पाच गवे रुतून बसले होते. शिवाय विहिरीचा भाग आतपर्यंत खोल असल्याने या गव्यांची विहिरीबाहेर येण्याची केविलवाणी धडपड सुरू होती. गव्यांचे वजनदेखील अधिक असल्याने त्यांना बाहेर काढणे कठीण झाले होते. दुसºया दिवशी सकाळी याठिकाणी जेसीबी मागवून विहिरीचा काही भाग काढून गव्यांना बाहेर येण्यासाठी वाट करण्यात आली. यानंतर हे पाचही गवे विहिरीबाहेर आले.