यंत्रमागधारकांना थोडा दिलासा थोडा संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:33 AM2021-02-27T04:33:26+5:302021-02-27T04:33:26+5:30
सविस्तर खुलासा आवश्यक : 'लोकमत' ने उठविला होता आवाज लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : यंत्रमागधारकांच्या वीज सवलत ऑनलाइन नोंदणीबाबत ...
सविस्तर खुलासा आवश्यक
: 'लोकमत' ने उठविला होता आवाज
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : यंत्रमागधारकांच्या वीज सवलत ऑनलाइन नोंदणीबाबत शासनाने मुदतवाढ देण्याबरोबरच ऑनलाइनसह ऑफलाइन अर्जालाही परवानगी दिली. असे असले तरी त्यामध्ये २७ अश्वशक्तीवरील यंत्रमाग व्यावसायिकांचा उल्लेख नाही. तसेच ऑफलाइनसंदर्भात स्पष्टता नाही. त्यामुळे दिलासा मिळूनही संभ्रमावस्था कायम राहिली आहे. शासनाने सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी होत आहे.
यंत्रमागधारकांना वीज सवलत हवी असल्यास ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असल्याचा आदेश शासनाने दिला होता. त्यामध्ये तीन पानी किचकट प्रक्रिया, कागदपत्रांच्या अडचणी, तसेच अनावश्यक माहिती कशासाठी, अशा विविध प्रश्नांमुळे यंत्रमागधारकांच्यात संभ्रमावस्था निर्माण होऊन नोंदणीला अल्पप्रतिसाद मिळाला. त्यावर 'लोकमत' ने आवाज उठविला. त्यानंतर 'लोकमत'चे कात्रण जोडून यंत्रमागधारक जागृती संघटना, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन यांच्यासह विविध संघटनांच्यावतीने वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख व राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे ऑनलाइन नोंदणी रद्द करावी, अशी मागणी केली.
त्यावर मंत्री यड्रावकर यांनी वस्त्रोद्योग विभागाबरोबर चर्चा करून ऑनलाइन नोंदणीला तत्काळ मुदतवाढ देणे. तसेच २७ अश्वशक्तीखालील यंत्रमागधारकांना ऑफलाइन अर्ज देण्यासाठी मुभा देणे, असे निर्णय करून घेतले. त्यानुसार शासन निर्णय करून यंत्रमाग संघटनांना दिला. परंतु त्यामध्ये २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांचा उल्लेख नाही. तसेच ऑफलाइन अर्ज कसे भरणे, कोठे जमा करणे, कागदपत्रांच्या त्रुटीबाबतचा खुलासा नसल्याने पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे ही संपूर्ण किचकट प्रक्रियाच रद्द करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
प्रतिक्रिया २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांचा रितसर खुलासा तसेच अन्य यंत्रमागधारकांचे भाडेतत्त्वावरील शेड, वडिलांच्या नावे वीजजोडणी व इतर जाचक अटी याबाबत रितसर खुलासा करावा.
सतीश कोष्टी, अध्यक्ष, पॉवरलूम असोसिएशन
यंत्रमागधारक जागृती संघटनेच्या वतीने वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांना ई-मेलवरून व मंत्री यड्रावकर यांची भेट घेऊन मागणी केली. त्यावर त्यांनी सांगितलेला संपूर्ण खुलासा नोटिफिकेशनमध्ये नमूद नसल्याने हा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे वस्त्रोद्योग विभागातील अधिकारी मंत्र्यांचे आदेश मानत नाहीत, असे दिसते. तत्काळ सविस्तर खुलासा करून संभ्रम दूर करावा.
विनय महाजन, अध्यक्ष