थेट ‘भेट’ आणखी दीड वर्षांनी
By admin | Published: May 28, 2016 12:32 AM2016-05-28T00:32:49+5:302016-05-28T00:49:35+5:30
काळम्मावाडी योजना : तीन स्तरांवर काम सुरू; विविध परवानग्या मिळाल्याने गती
थेट ‘भेट’ आणखी दीड वर्षांनी
काळम्मावाडी योजना : तीन स्तरांवर काम सुरू; विविध परवानग्या मिळाल्याने गती
कोल्हापूर : शहरवासीयांना स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या हेतूने राबविण्यात येत असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम पुढच्या दीड वर्षांत पूर्ण होणार आहे. सध्या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी लवकरच सुरू होणाऱ्या पावसाळ्यात पुन्हा कामात खंड पडण्याची शक्यता आहे. प्रारंभी विविध विभागांच्या परवानगी मिळण्यास झालेला विलंब, ग्रामस्थांचा विरोध, तांत्रिक अडचणींतून आता कुठे योजनेच्या कामाने गती घेतली आहे.
कोल्हापुरातील पुईखडी ते राजापूर अशी ५२.४ किलोमीटरच्या अंतरात १८०० एम.एम.जाडीची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. त्यापैकी १५ किलोमीटर अंतरात जलवाहिनी टाकण्यात आली आहे. याशिवाय शहर हद्दीत १३.५० किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याचे कामही पूर्ण झाले आहे. उर्वरित जलवाहिनी टाकण्याचे काम गतीने सुरू आहे. जलवाहिनी टाकण्याबरोबरच राजापूरवाडी येथे जॅकवेल उभारण्याचे कामही एप्रिलपासून सुरू झाले आहे. वनविभागाची परवानगी मिळण्यास विलंब झाल्यामुळे हे काम उशिरा सुरू झाले. सध्या जॅकवेल उभारणीच्या कामात ११ पोकलँड, ४ ब्रेकर, १४ डंपर्स, २ रोलर अशा यंत्रणेसह आवश्यक तो कर्मचारी वर्ग कामात व्यस्त आहे.
चौदा मीटर व्यासाचे आणि ४० मीटर खोलीचे या जॅकवेल शेजारीच ३६ बाय २४ आकाराचे पंप हाऊस उभारण्यात येत आहे. धरणातील पाणी इंटकवेलद्वारे जॅकवेलमध्ये घेऊन उपसा करून एका पाण्याच्या टाकीत घेण्यात येणार आहे आणि तेथून ते नैसर्गिक दाबाने पुईखडीपर्यंत आणले जाणार आहे. पुईखडी येथे सध्या ५० एमएलडी पाणी शुद्धिकरणाची यंत्रणा कार्यान्वित आहे, आता नव्या योजनेद्वारे आणखी ८० एमएलडी पाणी शुद्धिकरणाची यंत्रणा निर्माण करण्यात येत आहे. त्यासाठी आठ बेड तयार केले जात आहेत. त्याचे कामसुद्धा युद्धपातळीवर सुरू आहे.
स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, परिवहन समिती सभापती लाला भोसले तसेच
स्थायी समितीचे सदस्य अजित ठाणेकर, सुनील पाटील, भूपाल
शेटे, रिना कांबळे, सूरमंजिरी
लाटकर, दीपा मगदूम, मनीषा कुंभार, रूपाराणी निकम, उमा इंगळे,
स्थायी समितीचे माजी सभापती सचिन चव्हाण, आदींनी या
योजनेच्या कामाची शुक्रवारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)
मुदत वाढवावी लागणार
काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची मुदत ३० महिन्यांची आहे. २४ आॅगस्ट २०१४ रोजी संबंधित कंपनीला वर्कआॅर्डर देण्यात आली; परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात व्हायला सात ते आठ महिन्यांचा विलंब झाला. फेबु्रवारी २०१७ मध्ये कामाची मुदत संपणार आहे; पण त्या मुदतीत हे काम पूर्ण होणार नाही. त्यामुळे किमान एकवर्ष तरी मुदत वाढवून द्यावी लागणार आहे. काहीही करून हे काम डिसेंबर २०१७ मध्ये संपवावे, असा अधिकाऱ्यांचा निर्धार आहे.