थेट पाईपलाईन : एप्रिल २०२१ चा नवा मुहूर्त, महापालिकेचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 04:20 PM2020-03-12T16:20:41+5:302020-03-12T16:22:54+5:30
मानवनिर्मित तसेच नैसर्गिक कारणांनी रखडलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम पूर्णत्वाच्या मार्गाने जात असून, एप्रिल २०२१ मध्ये ही योजना पूर्ण होऊन कार्यान्वित होईल, असा दावा बुधवारी महानगरपालिका प्रशासन केला. योजनेचे काम मुदतीत पूर्ण केले नसल्यामुळे ठेकेदारास रोज ५0 हजार रुपयांचा दंड करण्यात येत असून, तो बिलातून वसूल केला जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कोल्हापूर : मानवनिर्मित तसेच नैसर्गिक कारणांनी रखडलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम पूर्णत्वाच्या मार्गाने जात असून, एप्रिल २०२१ मध्ये ही योजना पूर्ण होऊन कार्यान्वित होईल, असा दावा बुधवारी महानगरपालिका प्रशासन केला. योजनेचे काम मुदतीत पूर्ण केले नसल्यामुळे ठेकेदारास रोज ५0 हजार रुपयांचा दंड करण्यात येत असून, तो बिलातून वसूल केला जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपामुळे चर्चेत राहिलेल्या थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची बुधवारी महानगरपालिका पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष धरणक्षेत्रात जाऊन पाहणी केली. सत्तारूढ कॉँग्रेस, राष्ट्रवादी बरोबरच भाजपचे पदाधिकारीही या पाहणी दौºयात सहभागी झाले होते.
यावेळी धरणक्षेत्रातील इनटेक वेल, इन्स्पेक्शन वेल क्र. १ व क्र. २, जॅकवेल, ब्रेकप्रेशर टॅँक, आदी कामांची पाहणी करण्यात आली. धरणक्षेत्रात जेथे काम केले जाणार आहे, तेथे सध्या पाणी असून, ते उपसा करण्यात येत आहे. त्याकरिता १२० एचपी क्षमतेच्या सहा मोटारी बसविण्यात आल्या आहेत. आणखी आठ ते दहा दिवस हे काम सुरू राहणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला पुन्हा सुरुवात होईल.
इनटेकवेलचे काम मागच्या वर्षी पूर्ण झाले आहे. इन्स्पेक्शन वेल क्र. १ चे काम पूर्ण झाले आहे. क्र. २ चे राफ्टचे काम बाकी आहे. ते पुढील महिन्यात पूर्ण केले जाणार आहे. ब्रेकप्रेशर टॅँकचे काम मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल. जॅकवेलची कामे युद्धपातळीवर करण्याचे नियोजन केले आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी जर जॅकवेलचे काम पूर्ण झाले, तर एप्रिल २०२१ पासून योजनेचे पाणी मिळेल, असे अधिकारी, तसेच ठेकेदाराच्या प्रतिनिधींनी सांगितले.
पावसाळा सुरू झाला की, योजनेचे काम बंद पडते. हा अनुभव लक्षात घेऊन यापुढील कामांचे दिवसागणीक नियोजन केले असून, त्यावर अतिरिक्त आयुक्त, सहायक आयुक्त दर्जाचे अधिकारी प्रत्येक दिवशी नियंत्रण ठेवणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कामाचा तपशील :
- ५२.९७ कि.मी. पाईपलाईनपैकी ४७ कि.मी.चे काम पूर्ण
- सुळंबी ते सोळांकूर ३.७० कि.मी.चे पाईप टाकण्याचे काम अपूर्ण
- शहरांतर्गत ६००, ८०० व १००० मि.मी. व्यासाची पाईप टाकण्याचे काम पूर्ण
- जॅकवेलचे काम ६० टक्के पूर्ण, तर १५ जूनपर्यंत उर्वरित काम पूर्ण करण्याचे टार्गेट
- पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राचे ८५ टक्के काम पूर्ण, मेपर्यंत कार्यान्वित होणार.
दंड सुरूच राहणार : आयुक्त
ठेकेदाराने मुदतीत काम पूर्ण केले नसल्यामुळे त्यांना रोज ५0 हजार रुपये दंड केला जात असून, तो यापुढेही सुरूच राहणार आहे. आतापर्यंत तीन कोटी ८० लाख रुपये दंड झाला असून, तो बिलातून वसूल केला आहे. ठेकेदाराने काम सुरू असल्यामुळे दंड माफ करावा, अशी विनंती केली आहे; परंतु अद्याप आम्ही काहीच निर्णय घेतलेला नाही, असे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले.
अतिवृष्टीने कॉपरडॅम खचला
गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कॉपरडॅम खचला आहे. त्यामुळे जॅकवेलसाठी खुदाई केलेल्या जागेत पाणी साचले असून, जॅकवेलच्या कामास उशीर होत आहे. मात्र, हे काम १५ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. कोणत्याही परिस्थितीत जॅकवेलचे काम पूर्ण करा, अशा सूचना ठेकेदारास देण्यात आलेल्या आहेत, असे महापौर निलोफर आजरेकर यांनी सांगितले.
कामाची गती वाढवा : सूर्यवंशी
योजना पूर्णत्वाकडे नेण्याचे प्रयत्न सुरू असले तरीही काही मर्यादा आहेत. म्हणूनच कामाची गती वाढविली तरच ही योजना लवकर पूर्ण होईल. वास्तविक मूळ नियोजनाप्रमाणे आधी धरणक्षेत्रातील कामे पूर्ण होणे आवश्यक होते. त्यानंतर मग जलशुद्धीकरण केंद्र, जलवाहिनी टाकण्याची कामे करायला पाहिजे होती; परंतु ठेकेदाराने उलट दिशेने कामाला सुरुवात केली. दंड करणे म्हणजे योजना पूर्ण करणे नव्हे, तर दंड करण्यापेक्षा योजना पूर्ण होणे महत्त्वाचे आहे, असे विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यात महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, आयुक्त कलशेट्टी, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, शिक्षण सभापती श्रावण फडतारे, महिला बाल कल्याण सभापती शोभा कवाळे, सभागृह नेता दिलीप पोवार, विरोधी पक्षनेता विजय सूर्यवंशी, कॉँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, भाजपचे गटनेते अजित ठाणेकर,राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील, ताराराणीचे नगरसेवक ईश्वर परमार, जलअभियंता भास्कर कुंभार, ठेकेदाराचे प्रतिनिधी राजेंद्र माळी सहभागी झाले होते.