पाईपलाईनच्या कामात ‘थेट’ दरोडा

By Admin | Published: April 27, 2017 12:48 AM2017-04-27T00:48:49+5:302017-04-27T00:48:49+5:30

भाजप-ताराराणीचा आरोप : अंदाजपत्रक चुकीचे; २० लाखांच्या लोखंडी पुलाचा खर्च दाखविला अडीच कोटी

'Live' robbery in pipeline work | पाईपलाईनच्या कामात ‘थेट’ दरोडा

पाईपलाईनच्या कामात ‘थेट’ दरोडा

googlenewsNext

कोल्हापूर : शहरासाठी महत्वाची असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे चुकीचे अंदाजपत्रक केल्याचा भांडाफोड करण्यात आल्याने ही योजना वादात सापडली आहे. किमान १८ ते २० लाख रुपयांत होणाऱ्या लोखंडी पुलाच्या कामांवर अडीच कोटींचा खर्च झाल्याचा आरोप अंदाजपत्रकातील तरतूद आणि प्रत्यक्ष झालेले काम याच्या पडताळणीनंतर भाजप-ताराराणी आघाडीने बुधवारी केला.
थेट पाईपलाईन योजनेची सिमेंटची जलवाहिनी टाकण्यासाठी चार लोखंडी उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. ठिकपुर्लीजवळील एका कालव्यावर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. ज्या कामाला प्रत्यक्षात १८ ते २० लाख रुपये खर्च येणार आहे, त्याच उड्डाण पुलासाठी तब्बल २ कोटी ४८ लाख रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. हा उड्डाणपूल ७५ फूट लांब आणि १२ फूट रुंदीचा आहे. अशाच प्रकारचे आणखी तीन उड्डाणपूल बांधले जाणार असून, त्याचा खर्च ३० कोटींच्या घरात जाणार आहे.
अंदाजपत्रकातील तरतुदी आणि प्रत्यक्ष जागेवर झालेले काम याची पडताळणी केली असता मोठी तफावत असल्याचा आरोप भाजप गटनेते विजयराव सूर्यवंशी व ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषदेत केला.
योजनेचा सविस्तर आराखडा (डीपी) तयार करण्यापासून सुपरव्हिजन, झालेल्या कामाची बिले काढण्यापर्यंतची सर्व कामे या योजनेची सल्लागार कंपनी करत आहे. त्यामुळे या योजनेच्या आडून जनतेच्या पैशांवर संगनमताने दरोडा घातला जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. कोणत्याही विभागाची परवानगी न घेता माजी मुख्यमंत्री व स्थानिक माजी मंत्र्यांनी घाईगडबडीने योजनेच्या कामाचा प्रारंभ केला, पण हीच घाई उद्या कोल्हापूरकरांची कायमची डोकेदुखी होऊ नये म्हणून योजनेच्या कामावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्याकरिताच आम्ही या विषयावर चर्चा करण्याकरिता ‘विशेष सभा’ बोलवावी, अशी मागणी केली असली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रारही कदम, सूर्यवंशी यांनी केली.

मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना भेटणार
थेट पाईपलाईन योजनेत ४० कोटींचा ढपला पाडण्यात आल्याचा आरोप यापूर्वी झाला आहे; परंतु योजना लोकहिताची असल्याने ती लवकर पूर्ण व्हावी म्हणून त्या वादात पडलो नाही; परंतु आता मात्र चुकीची, बोगस अंदाजपत्रके तयार करून जनतेच्या पैशांची कशी लूट केली गेली याची माहिती आम्हाला मिळाली आहे. याची चौकशी करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच या योजनेच्या पूर्ततेसाठी जादा सक्षम अधिकारी नेमावेत, अशी मागणी ‘भाजप-ताराराणी’चे ३३ नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करणार असल्याचे भाजपच्या नगरसेवकांनी सांगितले.
आयुक्तांकडे केली तक्रार
भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिजित चौधरी यांची भेट घेऊन चुकीची अंदाजपत्रके कशी केली आहेत याचे ठिकपुर्ली येथील उड्डाणपुलाच्या कामासह उदाहरण दिले. बोगस अंदाजपत्रके तयार झाली असून त्याची चौकशी करावी आणि ती तशी बोगस आढळली तर त्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी आयुक्त चौधरी यांनी संपूर्ण कागदपत्रे व लेखी तक्रार देण्याचे आवाहन केले.
कामावर नजर ठेवणार
योजनेच्या कामाची चौकशी केली जाईल, संबंधितांवर कारवाई होईल; पण मंजूर योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व्हावी यासाठी आम्ही महापालिकेतील भाजप-ताराराणी आघाडीचे सर्व नगरसेवक पुढाकार घेणार आहोत, आमच्या आरोपांमुळे किंवा आम्ही घेतलेल्या भूमिकेमुळे काम बंद पडू देणार नाही, असेही कदम, सूर्यवंशी यांनी सांगितले.

नगरसेवकांनी केलेल्या आरोपांसंदर्भात
थेट पाईपलाईन योजनेच्या देखभालीचे
काम पाहणाऱ्या युनिटी क न्सल्टंट यांच्याकडे
स्पष्ट अहवाल मागितला आहे. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर तो आयुक्तांसमोर ठेवण्यात येईल.
- सुरेश कुलकर्णी, प्रभारी जलअभियंता, शहर


त्यांनी सत्काराला यावे
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी योजनेचे काम पूर्ण केल्यास भाजपच्या नेत्यांचा सत्कार करू, असे वक्तव्य कोल्हापुरात केले होते. त्याचा समाचार घेत सूर्यवंशी यांनी, त्यांनीच घाईगडबडीत योजना मंजूर करून आमच्यासमोर अडचणी निर्माण करून ठेवल्या. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून त्या अडचणी सोडवून योजना दर्जेदारपणे पूर्ण करून घेऊ. त्यांनी बिंदू चौकात सत्कार समारंभाचे नियोजन करावे, असे आव्हान दिले.

Web Title: 'Live' robbery in pipeline work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.