मांजात अडकलेल्या कावळ्याला तरुणांकडून जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 03:11 PM2020-02-08T15:11:48+5:302020-02-08T15:21:32+5:30
मांजात अडकलेल्या कावळ्याला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅन्ड रिसर्च सोसायटी व सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठानमधील तरुणांनी बुधवारी जीवदान दिले. या तरुणांनी आठवडाभरात बिंदू चौक आणि हुतात्मा पार्कात उंच झाडावर अडकलेल्या आणि जिवाच्या आकांताने फडफडणाऱ्या दोन कावळ्यांना शर्थीचे प्रयत्न करून वाचवले. अग्निशमन दलाचीही मदत घेण्यात आली.
कोल्हापूर : मांजात अडकलेल्या कावळ्याला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅन्ड रिसर्च सोसायटी व सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठानमधील तरुणांनी बुधवारी जीवदान दिले. या तरुणांनी आठवडाभरात बिंदू चौक आणि हुतात्मा पार्कात उंच झाडावर अडकलेल्या आणि जिवाच्या आकांताने फडफडणाऱ्या दोन कावळ्यांना शर्थीचे प्रयत्न करून वाचवले. अग्निशमन दलाचीही मदत घेण्यात आली.
‘ढील ढील दे दे रे रे रे भैय्या, इस पतंग को ढील दे......’ असे गाणे गुणगुणत पतंग उडवणे सोपे असते. एकमेकांचा पतंग कापता यावा, म्हणून वापरल्या जाणाऱ्या या मांजा दोऱ्यामुळे मात्र अशा निरपराध जिवांचे दोरच कापले जात आहेत. अशा घटना वारंवार घडत आहेत.
चार, पाच दिवसांपूर्वी बिंदू चौकातील एका उंच झाडावर मांजा दोऱ्यामध्ये अडकलेल्या कावळ्याला जीवदान दिले होते. बुधवारी हुतात्मा पार्कात आणखी एक कावळा असा दोऱ्यात अडकल्याचा फोन तेथील व्यावसायिक शेखर वाघमारे यांंनी केला. क्षणाचाही विलंब न करता संदीप देवकुळे, आशुतोष सूर्यवंशी, अवधूत पाटील, देवेंद्र भोसले, अनिकेत खोत, अनिरुद्ध सावंत, ओमकार पाटील, अभिजित सूर्यवंशी हे मित्र धावले.
झाड खूपच उंचीवर, ओढ्यालगत आणि खूप धोकादायक असल्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. झाडावरून काढत असताना कावळा खाली ओढ्यात पडला. ओढ्यातील सांडपाण्याला दुर्गंधी सुटलेली असतानाही आशितोष सूर्यवंशी व अवधूत पाटील हे दोघे त्या सांडपाण्यात उतरले.
माणुसकीवरून विश्वास उडाल्याने कदाचित तो कावळा दूर जाण्याचा प्रयत्न करीत होता. पण पंख आणि पाय हे मांजामध्ये अडकल्याने अखेर त्याने सहकार्य केले. मांजाची खूप गुंतागुंत झाली होती. कावळ्याला कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन त्या सगळ्या त्रासातून त्याची मुक्तता केली.
कावळ्याच्या जिवाचा प्रश्न सुटला पण हे जर असंच चालत राहिलं तर आपण आपल्या हौसेखातर अशा निरपराध पशुपक्ष्यांचा बळी घेणार का? हा प्रश्न मात्र आ वासून उभा आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. आपला छंद, आवड आपण जरूर बाळगावी पण त्यामुळे एखाद्याचा जीव जात असेल तर तो छंद, ती आवड काय कामाची?
- संदीप देवकुळे,
सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठान