जगणे कुलूप बंद-सांस्कृतिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:22 AM2020-12-29T04:22:32+5:302020-12-29T04:22:32+5:30

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे सामाजिक-सांस्कृतिक-क्रीडा अशा क्षेत्रांत अलौकिक कार्य करणाऱ्या ...

Living lock-off cultural | जगणे कुलूप बंद-सांस्कृतिक

जगणे कुलूप बंद-सांस्कृतिक

Next

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे सामाजिक-सांस्कृतिक-क्रीडा अशा क्षेत्रांत अलौकिक कार्य करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीला मानाच्या राजर्षी शाहू पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा हा पुरस्कार वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक व प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर झाला आहे. मात्र, कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाने केवळ पुरस्काराची घोषणा केली, वितरणाचा कार्यक्रम झाला नाही.

--

सांस्कृतिक च‌ळवळींना ब्रेक गायन समाज देवल क्लब, भालजी पेंढारकर केंद्र, संस्कारभारती, करवीर नगर वाचन मंदिर, गुणीदास फौंडेशन, अंतरंग या सांस्कृतिक संस्थांसह कोल्हापुरात अनेक लहान मोठ्या संस्था व व्यक्ती वैयक्तिक पातळीवर गायन, वादन, नृत्यांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. उन्हाळ्यात शिबिर होतात. ही मेजवानी यंदा झालीच नाही.

--

विचारांचा जागर थांबला : शहरात पुरोगामी विचारांचा जागर करीत शहरात चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा मोठ्या प्रमाणात होतात. अवि पानसरे व्याख्यानमाला, तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमाला, वि. स. खांडेकर व्याख्यानमाला, दिगंबर जैन बोर्डिंग, राजर्षी शाहू व्याख्यानमाला असा विचारांचा जागर थांबला.

--

चित्र-शिल्पकलेचा कॅनव्हास सुना : कोल्हापूरला चित्र-शिल्पकलेची मोठी परंपरा असून, व्यावसायिक कलाकारांपासून ते हौशी कलेचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंतची संख्या तीन हजारांवर आहे. गेली दहा महिने चित्र-शिल्प प्रदर्शन बंद आहेत.

--

महोत्सवांना ब्रेक

महिलांसाठी झिम्मा-फुगडी स्पर्धांसह कलागुण सादर करण्याची संधी, कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, गृहिणी-भगिनी महोत्सव, महिला मंडळांचे कार्यक्रम, ताराराणी महोत्सव, कलामहोत्सव, कृषी महाेत्सव, नवरात्रौत्सवात गरबा-दांडिया अशा विविध महोत्सवांनी कोल्हापूर कायम फुललेले असते. या महोत्सवांनाही यंदा ब्रेक लागला आहे.

---

गौरी-गणपती, दसरा, दिवाळीही थंड

श्रावणापासून सणांना सुरुवात होते तशी बाजारपेठेला उभारी मिळते. यंदा मात्र गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया, श्रावण, गौरी गणपती या काळात कोरोनाने थैमान घातल्याने लॉकडाऊनच सुरू होते. कोणालाही सणाचा आनंद लुटता आला नाही. नवरात्रौत्सवापासून रुग्णांची संख्या कमी होऊ लागली; पण लॉकडाऊनने नागरिकांचा आर्थिक कणाच मोडल्याने बाजारपेठेत शांतता होती. दिवाळीला मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर आले; पण ही खरेदी गरजेपुरतीच, पैसे हातचे राखूनच होती, पण आठ महिन्यांच्या तुलनेत व्यावसायिकांसाठी हेही तसे थोडके होते. गाठी-भेटी करायलाही लोक घाबरले.

--

पर्यटन थांबले

उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांनी कोल्हापूर हाऊसफुल्ल होते. मात्र, कोरोनामुळे अंबाबाई, जोतिबा मंदिरांसह पर्यटन स्थळेही बंद होती. दिवाळीनंतर धास्तीमुळे लोक पर्यटनासाठी बाहेर पडले नाहीत. स्थानिक पातळीपासून ते राज्यांतर्गत, देशातील विविध ठिकाणे व परदेशातील पर्यटनही थांबले.

--

--

लग्न-समारंभ ५० माणसात

विवाह सोहळा धुमधडाक्यात आणि अविस्मरणीय करण्यासाठी महिनोनमहिने तयारी केली जाते, यंदा मात्र लग्न असाे, वा बारसं, मुंज, स्वागत समारंभ असे सगळे कौटूंबिक सोहळे ५० माणसांच्या मर्यादेत करावे लागले, तेही अगदी साधेपणाने. ज्या कुटुंबांमध्ये हे शक्य नाही त्यांनी सगळे कार्यक्रम पुढे ढकलले.

--

जत्रा-यात्रा बंद

जिल्ह्यातील ग्रामीण भागात अगदी गावागावांमध्ये माही, स्थानिक देवतांच्या जत्रा, यात्रा मोठ्या प्रमाणात होतात. यंदा एकाही गावात अशा जत्रा, यात्रा झाल्या नाहीत. प्रतीकात्मक मंदिरात पूजा आणि घराघरांतच नैवेद्य दाखवून हा दिवस साजरा करावा लागला.

----

तिसरी घंटा वाजलीच नाही

कोरोनामुळे यंदा राज्य नाट्य स्पर्धा झालीच नाही, हौशी, व्यावसायिक, संस्कृत, हिंदी, संगीत नाटक, बाल नाट्य अशा वेगवेगळ्या विभागात ही स्पर्धा रंगते. यंदा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ही स्पर्धा न घेतल्याने नाट्य चळवळीची पिछेहाट झाली. दुसरीकडे नाट्यगृहांना ५० टक्के आसन क्षमतेची मर्यादा घालून नाट्य, सांगीतिक कार्यक्रम सादरीकरणाला परवानगी मिळाली असली तरी आर्थिक गणितात हे बसत नसल्याने अजूनही तिसरी घंटा वाजली नाही, आणि रंगमंचाचा पडदा उघडला नाही.

---

Web Title: Living lock-off cultural

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.