जिवंत भाव आणि कौशल्य हाच शिल्पकलेचा आत्मा - थेट संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 11:58 PM2019-01-17T23:58:55+5:302019-01-18T00:04:20+5:30
शिल्पकार किशोर पुरेकर हे सध्या शाहू समाधिस्थळावर बसविण्यात येणारा राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा घडवत आहेत. त्यांना रविवारी ‘रंगबहार’च्या वतीने आयोजित ‘मैफल रंगसुरांची’ या कार्यक्रमात
शिल्पकार किशोर पुरेकर हे सध्या शाहू समाधिस्थळावर बसविण्यात येणारा राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा घडवत आहेत. त्यांना रविवारी ‘रंगबहार’च्या वतीने आयोजित ‘मैफल रंगसुरांची’ या कार्यक्रमात ‘चंद्राश्री’ पुरस्कार देण्यात येणार आहे. यानिमित्त त्यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...
प्रश्न : तुम्ही शिल्पकलेचे धडे कुठे घेतले?
उत्तर : आम्ही कुंभार असल्यामुळे, लहानपणापासून आजोबा आणि वडिलांकडूनच मूर्ती बनविण्याचे धडे गिरवायला आमची सुरुवात झाली. पारंपरिक व्यवसाय असल्याने मूर्तिकामात छान हात बसला. या कलेचे कंगोरे समजत गेले. तिच्यातच आवड निर्माण झाली. या कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी कलामंदिर महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे अॅडव्हान्सपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर मुंबईत जे. जे. स्कूल आॅफ आर्टस्मध्ये शिक्षण घेतले. शिल्पकलेत, व्यक्तिचित्रणात चांगले कौशल्य मिळविले. त्यासाठी विद्यार्थीदशेतच असताना तीन व व्यावसायिक गटांतून तीन असे राज्य शासनाचे सहा पुरस्कार मिळाले. अमेरिकेतील ‘पोर्ट्रेट सोसायटी आॅफ अमेरिका’ यांच्यावतीने सन २०१३ मध्ये गौरविण्यात आले. नागपूर येथील साउथ सेंट्रल झोननेही पुरस्कार प्रदान केला.
प्रश्न : आपण आजवर केलेल्या महत्त्वाच्या कलाकृती (शिल्प) कोणत्या?
उत्तर : छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, संतांचे पुतळे मी बनविले आहेत. कोल्हापुरात खरी कॉर्नर येथील कॅमेरा स्तंभ, त्यामागील कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या कार्याची माहिती देणारे शिल्प, खरी कॉर्नर चौकातील हाताचा स्तंभ, रत्नाप्पा कुंभार, शंकरराव पाटील, जयसिंग यादव, श्रीपतराव बोंद्रे ही काही महत्त्वाची शिल्पे मी घडवली. कोल्हापुरात म्युरल्स या संकल्पनेची सुरुवात माझ्यापासून झाली. एखाद्या शिल्पामागे असलेला इतिहास त्यानिमित्ताने मांडण्याचा मी प्रयत्न केला.
प्रश्न : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधिस्थळाच्या कामाचा अनुभव कसा आहे?
उत्तर : शाहू महाराजांमुळे कोल्हापूरचे कलापूर झाले. ते नसते तर कलामहर्षी बाबूराव पेंटर, आबालाल रेहमान असे कलावंत घडले नसते आणि हे कलावंत नसते तर कोल्हापूरला कलापरंपरा लाभली नसती. अशा या राजाचा पुतळा बनविण्यासाठी माझी निवड झाली, हे मी माझे भाग्य समजतो. महाराजांच्या समाधिस्थळाच्या मूळ शिल्पाचे काम सोपे होते; पण मेघडंबरी अधिक अवघड होती. ही मेघडंबरी म्हणजे शाहू महाराजांनीच इटलीत आजोबा राजाराम महाराजांच्या समाधिस्थळासाठी बनवून घेतलेल्या मेघडंबरीची प्रतिकृती आहे. त्यासाठी मूळ मेघडंबरीचे स्केच, चित्र, छायाचित्रांचा अभ्यास केलाच; पण त्याला स्थानिक वास्तूची जोड देत भवानी मंडपाचे नक्षीकाम साकारले. मेघडंबरीत छोटीशी चूकही राहू नये यासाठी आधी फायबरचे मोल्ड, डेमो तयार केले. त्यातील त्रुटींचा अभ्यास करून मूळ मेघडंबरी बनविण्यात आली.
हे सगळे काम तांत्रिकदृष्ट्या खूप अवघड होते. ते साकारण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला. यासाठी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, अभिजित कसबेकर-जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. आता शाहू महाराजांच्या मूळ शिल्पाचेकाम अंतिम टप्प्यात असून चारीही बाजूंनी महाराजांच्या वेगवेगळ्या वयांतील शिल्पे साकारण्यात आली आहेत.
प्रश्न : शिल्पकलेकडे बघण्याचा नव्या पिढीचा कल कसा वाटतो?
उत्तर : मध्यंतरीचा काळ चित्रकला व शिल्पकला दोन्हींसाठी कठीण होता. आता पुन्हा नवी पिढी या क्षेत्राकडे वळली आहे. कोल्हापुरातील सर्व कला महाविद्यालयांमधील विद्यार्थीसंख्या आणि ते करीत असलेले काम पाहून या क्षेत्रात होत असलेले बदल प्रकर्षाने जाणवतात. हा बदल चांगला असला तरी नव्या पिढीला शॉर्टकटचा मार्ग अधिक जवळचा वाटतो. शिल्पकलेचे काम अतिशय कष्टाचे आहे. त्यात तुम्ही स्वत:ला कौशल्यपूर्णरीतीने कसे घडवता, हे महत्त्वाचे आहे.
प्रश्न : शिल्पकला क्षेत्रातील नवी आव्हाने कोणती?
उत्तर : मातीकामात आमची अनेक वर्षे गेली. त्यातून शिल्पांमध्ये
जिवंत भाव आणण्यासाठीची कलात्मकता आमच्या हातांनी साध्य केली; पण आता हे सगळं संगणकावर होतंय. चीन ही शिल्पकलेतील सध्याची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. तेथे शिल्पकलेचे औद्योगिकीकरण झाले असून अत्याधुनिक मशिनरींवर काम चालते. सरदार वल्लभभार्इंचा पुतळा हेदेखील मशिनरीद्वारे बनलेले शिल्प आहे. आपल्याकडे अजूनही हातांनी शिल्पे घडविली जातात. आपली स्पर्धा मशीन्सशी आहे. भविष्यात माणसांचे काम कमी होत जाणार आहे. अशा परिस्थितीत शिल्पकलेत आपले स्वत:चे कौशल्य आणि वेगळेपण सिद्ध केले पाहिजे.