सिलिंडरचा भार झाला हलका
By admin | Published: August 29, 2014 12:24 AM2014-08-29T00:24:11+5:302014-08-29T00:31:41+5:30
निर्णयाचे स्वागत : आता वर्षभर अनुदानित बारा सिलिंडर; मोठ्या कुटुंबांचा त्रास होणार कमी
कोल्हापूर : प्रत्येक महिन्याला फक्त एकच अनुदानित गॅस सिलिंडर देण्याची अट रद्द केल्यामुळे आता सहा ते दहा व्यक्तींच्या कुटुंबाचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. महिन्याला एकच सिलिंडर या अटीमुळे सणासुदीच्या दिवसांत अशा मोठ्या संख्येच्या कुटुंबाला गॅससाठी विनवण्या करण्याची वेळ येत असे, परंतु आता अशी वेळ तर येणार नाहीच शिवाय वेळेवरसुध्दा सिलिंडर मिळण्याची सोय झाली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे सर्वसामान्य ग्राहकांतून स्वागत करण्यात येत आहे.
काँग्रेस आघाडी सरकारने यापूर्वीच एका ग्राहकाला वर्षाला बारा अनुदानित गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु प्रत्येक महिन्याला एकच सिलिंडर देण्याची अट घालण्यात आली होती. त्यामुळे मुस्लिम समाजात रमजान महिन्यात तर हिंदू समाजात गणपती, दसरा व दिवाळी अशा सणासुदीला गॅस जादा लागतो. महिन्याचे सिलिंडर आणल्यानंतर ते जर महिना भरण्यात दहा-बारा दिवस बाकी असतील, तर त्यासाठी गॅस ग्राहकांना किंवा गॅस एजन्सी चालकांना विनवणी करावी लागायची किंवा शेजाऱ्यांचे उसने सिलिंडर घेण्याची वेळ येत होती. जर सिलिंडर मिळालेच नाही, तर मात्र अन्य पर्यायांचा शोध घ्यावा लागत होता. त्यामुळे ग्राहकांची दमछाक होत असे.
ग्राहकांच्या या अडचणींची दखल घेत काल, बुधवारी कें द्र सरकारने वर्षभरात बारा सिलिंडर देण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजेच एक सिलिंडर घेतल्यानंतर महिना भरण्याची वाट न बघता त्याला लगेच दुसरे सिलिंडर मिळणार आहे. याचाच अर्थ ग्राहकाला एका महिन्यात जरी दोन किंवा तीन सिलिंडर लागली, तरी ती मिळू शकणार आहेत. बारा अनुदानित सिलिंडरचा कोटा संपल्यानंतर वर्षाच्या शेवटी विनाअनुदानित सिलिंडर ग्राहकाला घेणे सोयीचे होणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांना आता कोणाकडे गॅस सिलिंडरसाठी विनवणी करावी लागणार नाही. थोडक्यात, बारा सिलिंडरचा निर्णय तोच असला, तरी सरकारने ती उपलब्ध करून देण्याची पद्धत बदलली आहे. (प्रतिनिधी)
अध्यादेश प्राप्त होताच अंमलबजावणी
केंद्र सरकारने बुधवारी वर्षभरात के व्हाही बारा अनुदानित सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा अध्यादेश अद्याप आलेला नाही. तो ज्या दिवशी आपल्याकडे येईल त्या दिवसापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल. यासंदर्भात एजन्सीना सूचना देण्यात येतील.
- मनीषा देशपांडे, सहायक पुरवठा अधिकारी