भूमिहीन दूध उत्पादकांना दोन लाखांपर्यंत कर्जपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:33+5:302021-07-10T04:17:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने ‘गोकुळ’, ‘वारणा’सह इतर दूध संघांकडील दूध उत्पादकांना आण्णासाहेब पाटील आर्थिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने ‘गोकुळ’, ‘वारणा’सह इतर दूध संघांकडील दूध उत्पादकांना आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाकडून म्हैस खरेदीसाठी दहा लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. भूमिहीन दूध उत्पादकांनाही विनातारण दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘गोकुळ’ वर्षाला दोन लाख लिटर दूध उत्पादन वाढीचे उद्दिष्ट निश्चित पार करेल. त्यासाठी आण्णासाहेब पाटील महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ, वसंतराव नाईक व्ही. जी. एन. टी. महामंडळ, संत रोहिदास विकास महामंडळातर्फेही दूध उत्पादकांना कर्ज देणार आहे. या योजनेतून केवळ राज्याबाहेरील जातीवंत म्हैस खरेदी करता येणार आहे.
कॉंग्रेस विचाराचे भाजप
केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार पाहिला तर त्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या नेत्यांनाच संधी मिळाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे, प्रितम मुंडे नाराज होणे साहजिकच आहे. त्या म्हणत असल्यातरी त्यांचा चेहरा सगळे सांगून जातो. भाजपमध्ये सगळे आयात केलेले नेते असून, मूळ विचार तिथे राहिला नसून कॉंग्रेस विचाराचे भाजप झाल्याची टीका मंत्री मुश्रीफ यांनी केली.
व्यापाऱ्यांनी सबुरीने घ्यावे
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह दर अजूनही अधिक आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी थोडे सबुरीने घ्यावे. ७० टक्के लसीकरण झाल्याशिवाय पूर्ववत गोष्टी होणार नसल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
जिल्हा बँकेची मध्यम मुदत कर्ज योजना -
राज्याबाहेरील दोन मुऱ्हा, मेहसाना, जाफराबादी म्हैस खरेदी - २.२० लाख
स्वगुंतवणूक - १० टक्के
कर्ज मंजुरी - २ लाख
मुख्य तारण - खरेदी केलेली जनावरे
सहतारण - दूध संस्था व दूध संघ हमी
जामीनदार- दोन सक्षम सभासद
व्याजदर- संस्थेस -१०.५० टक्के, सभासदास १२ टक्के
परतफेड मुदत - ३६ मासिक हप्ते