थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा, हसन मुश्रीफांच्या लक्षवेधीवर मंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 12:00 PM2022-08-26T12:00:59+5:302022-08-26T12:01:23+5:30

मुदतीत कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना १५ सप्टेंबर २०२२ पासून प्रोत्साहनपर लाभ मिळण्याचा मार्गदेखील मोकळा

Loan waiver relief to defaulting farmers, Cooperation Minister Atul Save informed about the target raised by MLA Hasan Mushrif | थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा, हसन मुश्रीफांच्या लक्षवेधीवर मंत्र्यांची माहिती

थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा, हसन मुश्रीफांच्या लक्षवेधीवर मंत्र्यांची माहिती

googlenewsNext

कोल्हापूर : आमदार हसन मुश्रीफ यांनी मांडलेल्या लक्ष्यवेधीला सहकार मंत्री अतुल सावे यांनी प्रतिसाद दिला असून, यामुळे महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा मिळणार आहे. तसेच मुदतीत कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना १५ सप्टेंबर २०२२ पासून प्रोत्साहनपर लाभ मिळण्याचा मार्गदेखील मोकळा झाल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

कोरोनाची साथ, टाळेबंदी आणि इतर तांत्रिक कारणांमुळे २०१९-२० या आर्थिक वर्षात अनेक शेतकऱ्यांना पीककर्जाची उचल करता आली नव्हती. या शेतकऱ्यांनी एप्रिल ते जून २०२० या कालावधीत कर्ज घेतले. कोल्हापूर जिल्ह्यातील असे ९२,०८८ शेतकरी या कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहू नयेत अशी मागणी मुश्रीफ यांनी लक्ष्यवेधी सूचनेद्वारे केली होती. २०१९-२० या आर्थिक वर्षात कर्ज घेऊ न शकलेले अनेक शेतकरी प्रोत्साहनपर लाभापासूनदेखील वंचित राहू नयेत, अशीही मागणी मुश्रीफ यांनी केली होती. या मागणीला सहकार विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील तरतुदीनुसार जे शेतकरी घेतलेल्या पीककर्जाची विहीत वेळेत परतफेड करतील, त्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. सरकारी योजनेनुसार २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या तीन आर्थिक वर्षांत कर्ज घेतलेले आणि मुदतीत परतफेड करणारे शेतकरी पात्र ठरणार होते. मात्र, कोरोना संकटाच्या काळात २०१९-२० मध्ये अनेक शेतकऱ्यांना कर्जच उचलता आले नाही. अशा शेतकऱ्यांनी त्यापूर्वीच्या दोन वर्षात घेतलेले कर्ज आणि त्याची मुदतीत केलेली परतफेड हा निकष लावण्यात यावा, अशी मागणी मुश्रीफ यांनी केली होती.

२०१७-१८ पासूनच्या तीनपैकी कुठल्याही दोन आर्थिक वर्षात हा निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेतील प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल, अशी माहिती सहकार मंत्र्यांनी निवेदनाद्वारे दिल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

Web Title: Loan waiver relief to defaulting farmers, Cooperation Minister Atul Save informed about the target raised by MLA Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.