कर्जाचे आमिष दाखवून व्यावसायीकाला साडेसात लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 07:08 PM2020-01-10T19:08:31+5:302020-01-10T19:10:11+5:30
बजाज फायनान्समधून ३० लाख रुपये कर्ज मंजूर झाल्याचे सांगून हॅकर्सनी खासगी व्यावसायीकास साडेसात लाख रुपयांना आॅनलाईन गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात संशयित काव्या कुलकर्णी, नेहा सावंत, अमोल पवार, राजीव राणे या अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुरुवारी (दि. ९) गुन्हा दाखल करण्यात आला.
कोल्हापूर : बजाज फायनान्समधून ३० लाख रुपये कर्ज मंजूर झाल्याचे सांगून हॅकर्सनी खासगी व्यावसायीकास साडेसात लाख रुपयांना आॅनलाईन गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात संशयित काव्या कुलकर्णी, नेहा सावंत, अमोल पवार, राजीव राणे या अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुरुवारी (दि. ९) गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी सांगितले, रामदास पांडुरंग सुरवसे (वय ३५, रा. गोकुळ शिरगाव, ता. करवीर) यांचा खासगी व्यवसाय आहे. त्यांच्या मोबाईलवर १६ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रिया शर्मा नावाच्या मुलीचा फोन आला. ‘मी बजाज फायनान्समधून बोलत आहे. तुम्हाला कर्ज मंजूर झाले आहे. त्याकरिता काव्या कुलकर्णी हिच्या व्हॉट्स अॅप नंबरवर तुमची कागदपत्रे पाठवा,’ असे त्याद्वारे सांगितले.
सुरवसे यांनी कागदपत्रे पाठविल्यानंतर सात लाख ६१ हजार रुपये कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. त्यानंतर नेहा सावंत, अमोल पवार यांनी फोन करून पूर्ण वार्षिक हप्त्याची रक्कम भरा; तसेच तुम्हाला जीएसटी, तिकीट आॅफर ३० लाखांपर्यंत वाढविण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर राजीव राणे याने वारंवार फोन करून पैसे भरण्यास सांगितले.
संशयितांनी सुरवसे यांचा विश्वास संपादन करून त्यांचे वेगवेगळ्या बँक खात्यांतून सुमारे सात लाख ६१ हजार रुपये भरून घेतले. त्यानंतर कर्जाची रक्कम मागितली असता सगळेच फोन बंद असल्याचे दिसून आले. त्यांना वेगवेगळ्या पाच मोबाईल नंबरवरून कॉल आले होते. त्यांनी स्थानिक बजाज फायनान्सच्या कार्यालयात चौकशी केली असता कंपनीतून असा कोणताही फोन केला नसल्याचे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुरवसे यांनी सायबर शाखेकडे तक्रार दिली.
रामदास सुरवसे यांच्याशी दोनच व्यक्ती वेगवेगळी नावे सांगून बोलत असाव्यात. त्यामध्ये तरुणी आणि तरुणाचा समावेश असण्याची शक्यता आहे. आॅनलाईन फसवणुकीचे रॅकेट मोठे आहे. संबंधित बँक खात्यांची चौकशी सुरू असून बँकांना पत्र दिले आहे. लवकरच हॅकर्सपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू.
संजय मोरे,
पोलीस निरीक्षक, सायबर क्राइम