वरिष्ठांचे ‘लॉबिंग’, कनिष्ठांची गळचेपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:23 AM2021-04-16T04:23:58+5:302021-04-16T04:23:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पोलीस निरीक्षक प्रदीप काळे प्रकरणानंतर पोलीस अधिकाऱ्यांतील अंतर्गत ‘लॉबिंग’ची खदखद चव्हाट्यावर आली. त्यामुळे जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पोलीस निरीक्षक प्रदीप काळे प्रकरणानंतर पोलीस अधिकाऱ्यांतील अंतर्गत ‘लॉबिंग’ची खदखद चव्हाट्यावर आली. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्याऐवजी डागाळू लागली. अर्थकारणाच्या उद्देशाने जिल्ह्यात आलेल्या काही वरिष्ठांची इच्छापूर्ती होत नसल्याने ते आपल्या हाताखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांची गळचेपी करत असल्याची चर्चा आहे. त्यातूनच खाकी वर्दीच्या आत लपलेले काहींचे खरे रूप त्यांच्या वागण्यातून समाजासमोर येऊ लागले आहे.
गेल्या दोन अडीच वर्षांत जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना काही प्रमाणात खीळ बसली असली तरीही ते पूर्णत: बंद आहेत, असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. तत्कालीन व विद्यमान पोलीस अधीक्षकांनी अवैध व्यवसाय बंद झाले पाहिजेत यासाठी आदेश दिला, तरीही काही वरिष्ठांच्या आशीर्वादाने दारू, मटका, गुटखा, ऑनलाइन बेटिंग आदी अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र आहे.
वनक्षेत्रपाल दीपाली चव्हाण यांंनीही वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली, हे प्रकरण ताजे असतानाच कोल्हापुरातील पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांचा आत्महत्येचा प्रयत्न हा प्रकार खरोखरच धक्कादायक आहे. मुंबईत पोलीस अधिकाऱ्यांतील अंतर्गत वादामुळे सचिन वाझे प्रकरण चव्हाट्यावर आले. त्याचप्रमाणे कोल्हापूर पोलीस दलातही नाराज व खुश असे पोलीस अधिकाऱ्यांचे दोन गट नेहमीच चर्चेला येत आहेत.
‘कलेक्टर’ची बदली, तरीही ‘मर्जी’मुळे सुटका नाही
बहुतांश पोलीस स्टेशनमध्ये डी.बी. पथक, गोपनीय व दप्तरी या तीन गटांतील काही साहेबांचे लाळेघोट असतात. ही पदे अधिकारी आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांनाच देतात. कारण हेच कर्मचारी अनेक प्रकरणांत ‘तोडपाणी’ करतात. तेच पोलीस हद्दीत फक्त ‘कलेक्टर’ची भूमिका बजावतात. म्हणूनच त्यांना महत्त्व असते. त्यांची इतरत्र बदली झाली तरीही साहेब स्वत:च्या फायद्यासाठी त्यांना लवकर सोडत नाहीत. शिवाय काम न करता फक्त रुबाब मारणारेही काही पोलीस आहेत, यामुळे ठरावीक प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर कामाचा नेहमीच बोजा दिसतो. त्यातून पोलीस कर्मचाऱ्यांत व अधिकाऱ्यांत दरी निर्माण होते.
वरिष्ठांवर हात उचलणाऱ्या ‘कलेक्टर’ना अभय
पंधरा दिवसांपूर्वी कसबा बावडानजीक रात्री दोघा मद्यधुंद पोलिसांनी गस्तीवरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर हात उगारला; पण संबंधित दोघाही पोलिसांनी अनेक वर्षे ‘कलेक्टर’ची भूमिका बजावल्याने त्यांच्यावर फक्त मुख्यालयातच बदली होणे, इतकीच कारवाई झाली. हेच कृत्य इतर सर्वसामान्य पोलिसांकडून घडले असते तर....... . अशा प्रवृतीमुळे खात्यात अंतर्गत वाद वाढत आहेत. राजारामपुरी पोलीस ठाण्यात तर दोन वर्षांपूर्वी केबिनवर हक्क बजावण्यासाठी चक्क हजेरी मास्तर पोलिसालाच विनयभंगाच्या गुन्ह्यात अधिकाऱ्याने अडकवल्याचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले.
अधिकाऱ्याने करून घेतली बदली
प्रदीप काळे यांनी क्राइम ग्रुपवर टाकलेल्या वादग्रस्त मेसेजचे प्रकरण ताजे असतानाच आर्थिक गुन्हे शाखेतील एका पोलीस निरीक्षकानेही वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून विशेष पोलीस महानिरीक्षकांना विनंती करून आपली बदली सातारा येथे दोन दिवसांपूर्वी करून घेतली. तसा त्यांनी धाडसी संदेश पोलिसांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवला. जिल्हा पोलीस दलात पोलीस अधिकाऱ्यांची ही अवस्था असेल तर पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा, अशी परिस्थिती आल्याचे एका पोलीस कर्मचाऱ्याने नाव न घेता सांगितले.
वरिष्ठांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करणे आवश्यक
अधिकारी हे निवृत्तीकडे झुकलेले असतात, त्यांनाही मान, अपमान, कौटुुंबिक अडचणी असतातच. परजिल्ह्यातून आलेल्या काही संवेदनशून्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना ह्या कनिष्ठ अधिकाऱ्यांचे काही घेणेदेणे नसते. शिस्तीच्या नावाखाली कनिष्ठ अधिकाऱ्यांची घुसमट होत असते. त्यांच्या विनंत्यांचा विचार होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांशी चर्चा करणे आवश्यक आहे.