रेन हार्वेस्टिंग केल्यास घरफाळ्यात सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:42 PM2019-07-01T23:42:56+5:302019-07-01T23:43:39+5:30
अतिरिक्त जागा वापर बंद करण्यासाठी बाजार कर वसुलीमध्ये वाढ करणे तसेच संभाजी उद्यान व सरसेनापती जाधव उद्यान दैनंदिन देखभालीचा ठेका देण्याचा निर्णय पालिका सभेत घेण्यात आला.
पेठवडगाव : अतिरिक्त जागा वापर बंद करण्यासाठी बाजार कर वसुलीमध्ये वाढ करणे तसेच संभाजी उद्यान व सरसेनापती जाधव उद्यान दैनंदिन देखभालीचा ठेका देण्याचा निर्णय पालिका सभेत घेण्यात आला. सोमवारी वडगाव पालिकेच्या सभागृहात सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोहनलाल माळी होते. यावेळी उपनगराध्यक्ष संतोष गाताडे, गटनेत्या प्रविता सालपे प्रमुख उपस्थित होत्या.
विषयपत्रिकेचे वाचन सुरेश भोपळे यांनी केले. तसेच भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी रेन हार्वेस्टिंग सिस्टीम करणाऱ्या मालमत्ता धारकांस घरफाळ्यामध्ये १० टक्के सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. वारणा नदीतून येणारे अतिरिक्त पाणी थेट महालक्ष्मी तलावात सोडण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. या सभेत विषयपत्रिकेवरील वीस व ऐनवेळच्या विषयांवर चर्चा होवून निर्णय घेण्यात आले.
सभेत पालिकेस १ कोटी ५० लाखांचा निधी प्राप्त होणार आहे. यामधून रि.स.नं. १४० मधील जमीन खरेदी करण्याचे प्रशासनाने नियोजन केले आहे. यास स्वीकृत नगरसेवक गुरूप्रसाद यादव यांनी हरकत घेत म्हणाले, उपलब्ध निधी ज्या कामासाठी आला आहे. त्यासाठी खर्च करावा, अशी सूचना केली. अजय थोरात यांनी ही जागा घेण्यासाठी शासनाकडून निधी आणावा, असे मत मांडले.
यावर बोलताना मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी संबंधित जागा मालकाने पालिकेस १२७ कलमाखाली नोटीस दिली आहे. त्यामुळे पालिकेला कोणत्याही परिस्थितीत जागा खरेदी करावी लागणार आहे. अन्यथा आरक्षणे रद्द होतील. यासंबंधी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे रक्कम जमा करावी लागणार आहे. मात्र, या सभेत निधी वर्ग करण्याचा किंवा जागा खरेदी करण्याचा निर्णय स्थगित ठेवत पुढील सभेत निर्णय घेण्याचे ठरले.
वृक्ष लागवडीचे सहा हजारांचे उद्दिष्ट ठरविले आहे. यावरही सभेत चर्चा झाली. गत वर्षाची किती झाडे जगली? असा खोचक प्रश्न नगराध्यक्ष माळी यांनी प्रशासनास विचारला. यावर चाचपडत अभियंता बळवंत बोरे यांनी ९० टक्के असे उत्तर दिले. यामध्ये हस्तक्षेप करत मुख्याधिकारी पाटील यांनी मी स्वत: देखरेख करतो. किमान ८० टक्के पेक्षा अधिक झाडे आम्ही जगविली आहेत.
यावर बोलताना विद्या पोळ यांनी शहरातील विविध शैक्षणिक संकुलाला झाडे जगविण्याचे आवाहन करावे. यातील ३ हजार झाडे शाहू शिक्षण प्रसारक सेवा संस्था पाच वर्षे जबाबदारी घेईल, असे सांगितले. तर प्रविता सालपे यांनी प्रत्येक नगरसेवकास झाडे लावण्यासाठी उद्दिष्ट देण्याची मागणी केली.
अनेक व्यापारी रस्त्यावर खिळे तसेच सांडपाणी टाकतात. त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच भूईभाडे प्रती चौरस मीटर दहा रुपये करण्यात आले आहे. तसेच हातगाड्यावर विक्री करणे २५ रुपये, तीन चाकी वाहनांना ५० तर चार चाकी वाहनांना दररोज १०० रुपये भुईभाडे आकारण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.चर्चेत कालीदास धनवडे, संतोष चव्हाण, संदीप पाटील, आदींनी भाग घेतला. यावेळी सुनिता पोळ, मैमुन कवठेकर, शबनम मोमीन, अलका गुरव, सावित्री घोटणे, नम्रता तार्इंगडे, अनिता चव्हाण, आदी उपस्थित होते.
कर्मचारी फोन उचलत नाहीत
केडरवरील कर्मचारी लोकप्रतिनिधींचा फोन उचलत नाहीत. हा मुद्दा थेट नगराध्यक्ष माळी यांनीच मांडला. यापुढेही असाच प्रकार घडल्यास दिवसाचा पगार कपात करण्याचा आदेश प्रशासनास देण्यात आला. यावेळी आमचाही फोन उचलत नाही. काय कारवाई करणार, असा प्रश्न अन्य नगरसेवकांनी उपस्थित केला.