स्थानिक कलाकारांचे हक्काचे ‘उपज कलामंच’
By admin | Published: August 8, 2016 12:06 AM2016-08-08T00:06:21+5:302016-08-08T00:06:21+5:30
गायन, वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम
विविध सांगीतिक उपक्रम; रसिकांची कौतुकाची थाप
संतोष तोडकर कोल्हापूर
संगीताची मोठी परंपरा लाभलेल्या कोल्हापूरसारख्या शहरात जागतिक कीर्तीचे अनेक कलाकार आपली कला सादर करण्यासाठी येत असतात; परंतु कलेची खाण असलेल्या स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांची कला प्रकाशझोतात यावी व त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने प्रदीप कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी २००९ मध्ये ‘उपज कलामंच’ची स्थापना केली.
गायन, वादन व नृत्य अशा कलांच्या त्रिवेणी संगमातून संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत विविध सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामधून स्थानिक कलागुणांना हक्काचे व्यासपीठ प्राप्त झाले आहे. २००९ साली संस्थेतर्फे ज्येष्ठ गायिका सुखदा काणे यांच्या गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यानंतर काही कारणास्तव संस्थेची वाटचाल थांबली; परंतु २०१३ साली पुन्हा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेत संस्थेने गायन, वादन व नृत्य अशा तिन्ही क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.
आॅक्टोबर २०१३ मध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत संस्थेअंतर्गत ‘कोल्हापूर म्युझिक सर्कल’ या शीर्षकाखाली उपक्रम करण्यास सुरुवात केली. या माध्यमातून कोल्हापुरातील सर्व तरुण कलाकारांना संधी मिळाली. दर दोन महिन्यांनी एक संगीतसभा, त्याप्रमाणे एक वादक, एक गायक अशा स्वरूपाचा कार्यक्रमाचा आराखडा ठरविण्यात आला. संस्थेतर्फे आजवर अशा १७ संगीतसभांचे आयोजन करण्यात आले आहे.
संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यांमधून अनेक गुणी विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. आपली कला सादर करण्यासाठी त्यांना व्यासपीठ व रसिकश्रोत्यांची कौतुकाची थाप मिळावी यासाठी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सांगीतिक कार्यक्रमांचे भरपूर आयोजन होते; पण आपण या क्षेत्रात कुठे आहोत व उत्तम कलाकार होण्यासाठी आपल्यामध्ये काय सुधारणा करायला हव्यात, यासाठी त्यांना आपली कला श्रोत्यांसमोर सादर करण्याची संधी मिळायला हवी, या कल्पनेतून संस्थेने उपक्रम घेण्यास सुरुवात केली. यासह कोल्हापूरचे प्रसिद्ध तबलावादक आमोद दंडगे यांच्या कार्यशाळेचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात आले होते. यावेळी त्यांनी युवा कलाकारांना मार्गदर्शन केले.
कोल्हापूरची संगीतपरंपरा समर्थपणे नेत असताना संस्थेच्या उपक्रमात ‘कलांजली’ संस्थेच्या सुचित्रा मोर्डेकर, रजनी करकरे-देशपांडे, प्रमोद देशपांडे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. तसेच गायन समाज देवल क्लब व तरुण, ज्येष्ठ कलाकारांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे सहकार्य संस्थेला लाभले आहे.
कोल्हापूर म्युझिक सर्कल
कोल्हापूर म्युझिक सर्कल अंतर्गत झालेल्या सांगीतिक कार्यक्रमात गायनामध्ये विनोद ठाकूरदेसाई, आनंद धर्माधिकारी, शिवराज पाटील, गौरी कुलकर्णी, रमा कुलकर्णी, स्वतंत्र तबलावादनामध्ये गिरिधर कुलकर्णी, प्रशांत देसाई, प्रणव मोघे, सतारवादनामध्ये मोहसीन मिरजकर, अजित कुलकर्णी; हार्मोनियममध्ये संदीप तावरे, प्रज्ञा रास्ते, हरिप्रिया पाटील, व्हायोलिनमध्ये केदार गुळवणी, बासरीमध्ये सचिन जगताप, नृत्यामध्ये नूपुर रावळ-तोरो यांचे क थ्थक, तर संयोगिता पाटील यांनी भरतनाट््यम् अशा अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली आहे.
आगामी उपक्रम
संगीत, गायन, वादन, नृत्य या क्षेत्रांतील कलाकारांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्थेतर्फे संगीतसभा, कार्यशाळा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तबलावादन स्पर्धा असे उपक्रम आगामी काळात राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. तसेच कोल्हापूर व सांगली, सातारा, बेळगाव, आदी भागांतील तरुण, ज्येष्ठ कलाकारांच्या कार्यक्रमांचे संस्थेतर्फे आयोजन करण्यात येणार आहे.
‘उपज कलामंच’
संस्थेचे पदाधिकारी
संस्थापक / अध्यक्ष : प्रदीप कुलकर्णी, उपाध्यक्ष : जितेंद्र मोरे, सचिव : अतुल दड्डीकर, खजिनदार : नीतेश जोशी, सदस्य : उमेश नेरकर, सुधीर जोशी, जीवन पाटील, सदाशिव गुरव, राजाभाऊ जोशी, आनंद धर्माधिकारी, प्रताप हलकर्णीकर, अभिषेक भाकरे, उमा नामजोशी.