महाबळेश्वरमध्ये आढळला प्रदेशनिष्ठ 'क्रिकेट फ्रॉग', पश्चिम घाटाच्या जैवविविधतेमध्ये भर
By संदीप आडनाईक | Updated: February 27, 2025 12:37 IST2025-02-27T12:36:38+5:302025-02-27T12:37:43+5:30
संशोधकांना बेडकाच्या नवीन प्रजातीचा शोध

महाबळेश्वरमध्ये आढळला प्रदेशनिष्ठ 'क्रिकेट फ्रॉग', पश्चिम घाटाच्या जैवविविधतेमध्ये भर
संदीप आडनाईक
कोल्हापूर : महाराष्ट्रातील उत्तर-पश्चिम घाटातील प्रेक्षणीय पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरमधून बेडकाच्या नव्या प्रदेशनिष्ठ प्रजातीचा शोध लावण्यात भारतीय संशोधकांना यश मिळाले. ‘क्रिकेट फ्रॉग’ या सामान्य नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘मीनर्वारीया’ या कुळात नव्याने शोधलेल्या बेडकाचा समावेश केलेला आहे. कोल्हापूरचे सरिसृप तज्ज्ञ डॉ. वरद गिरी यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. हा शोधनिबंध ‘झूटॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आहे.
या प्रजातीच्या उत्तर-पश्चिमी घाटातील आढळक्षेत्रावरून तिचे नामकरण ‘घाटी’ या संस्कृत आणि ‘बोरियालिस’ या उत्तरेकडील क्षेत्र दर्शवणाऱ्या लॅटीन शब्दांवरून केलेले आहे. या संशोधनात मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे, प्राध्यापक डॉ. ओमकार यादव, प्रा. डॉ. अमृत भोसले, प्रा. डॉ. प्रियांका पाटील, ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक अक्षय खांडेकर आणि भारतीय प्राणी सर्वेक्षणचे संशोधक डॉ. के. पी. दिनेश यांचा सहभाग आहे. त्यांना तेजस ठाकरे यांचे सहकार्य लाभले.
रातकिड्यांसारखा काढतात आवाज
मीनर्वारीया कुळातील बेडूक पोटावरील समांतर रेघांवरून इतर बेडकांहून वेगळे ठरतात. साठलेल्या पाण्याशेजारी किंवा छोट्या झऱ्यांच्या शेजारी बसून रातकिड्यांसारखा आवाज काढतात म्हणून त्यांना ‘क्रिकेट फ्रॉग’ म्हणतात. हे बेडूक महाबळेश्वरमधील कोळी आळीमधील एका खासगी वाहनतळामध्ये साठलेल्या पाण्याशेजारी आढळले.
वैशिष्ट्ये
- आकाराने ५.५ सेंमीपेक्षा मोठा
- पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांपुरता मर्यादित प्रजनन काळ
- आवाजामधील वेगळेपण आणि वैशिष्ट्यपूर्ण जनुकीय संच
- निशाचर आणि इतर प्रजातींपासून वेगळी
- छोटे कीटक हे मुख्य खाद्य
महाबळेश्वरसारख्या पर्यटनस्थळी अशा प्रदेशनिष्ठ बेडकाच्या प्रजातीचा शोध लागणे ही बाब त्या प्रदेशातील नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. या भागात काम करण्यासाठी तरुण पिढी पुढे येत आहे, ही अगदीच आनंदाची गोष्ट आहे. - डॉ. के. पी. दिनेश, संशोधक, भारतीय प्राणी सर्वेक्षण
हा शोध केवळ नवीन प्रजातीच्या यादीत एक नवीन नाव जोडण्यासाठी नाही; तर याने पश्चिम घाटाच्या जैवविविधतेच्या हॉटस्पॉटमध्ये चालू असलेल्या संरक्षण प्रयत्नांची गरज अधोरेखित केली आहे. - डॉ. ओमकार यादव, संशोधक