डीबीसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोट

By admin | Published: January 28, 2015 12:41 AM2015-01-28T00:41:22+5:302015-01-28T01:00:51+5:30

तिन्ही पोलीस ठाण्यांचा सहभाग : इचलकरंजीत गुन्हे रोखण्यासाठी एस. चैतन्य यांची नवीन संकल्पना

Local Crime Investigation Branch with DB | डीबीसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोट

डीबीसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोट

Next

अतुल आंबी-इचलकरंजी -शहर व परिसरात सुरू असलेल्या घरफोड्या, वाटमारी, चोऱ्या, धूमस्टाईलने दागिने लंपास, अशा घटनांचा तपास करण्यासाठी एक नवीन संकल्पना सहायक पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी निर्माण केली आहे. यामध्ये शहरातील तिन्ही पोलीस ठाण्यातील गुन्हे शोधपथक (डीबी) व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची एकत्रित मोट बांधली आहे. हद्दीचा वाद विसरून या पथकांमधील पोलीस चोरांना पकडण्यासाठी एकत्रित यंत्रणा राबविणार आहेत.
गत आठ महिन्यांपासून इचलकरंजी शहरासह परिसरातही चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे सामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये चोऱ्या झाल्याने अनेकांचे सर्वस्व चोरीला गेले आहे. अशा कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणीही चोरट्यांनी बिनधास्तपणे चोऱ्या केल्या. शहरातील शिवाजीनगर, गावभाग व शहापूर या तिन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत लागोपाठ चोऱ्या, घरफोड्या झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
त्याचबरोबर धूमस्टाईलने दिवसाढवळ्या भरचौकातून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, गंठण हिसडा मारून भरधाव वेगाने निघून जाण्याचे प्रकारही वारंवार घडत आहेत. त्यामुळे महिला वर्गाला असुरक्षितता जाणवत आहे.
भरीस भर म्हणून गंभीर स्वरूपाच्या वाटमारींचे प्रकारही शहरात सुरू झाले आहेत. शहापूर हद्दीत सोनाराला अडवून लुटण्याचा प्रकार, तसेच जुन्या बसस्थानक चौकात मोटारगाडी अडवून, कोयत्याचा धाक दाखवून साडेचार लाख रुपयांची रोकड लुटण्याचा प्रकार, यासह कामगारांना पगारादिवशी अडवून रोख रक्कम, मोबाईल काढून घेण्याचे प्रकार सुरूच आहेत.
त्याचबरोबर किरकोळ स्वरूपाच्या खंडण्या, हप्ता वसुली, बसस्थानक परिसरात प्रवाशांचे पाकीट मारणे, महिलांचे दागिने चोरणे, अशा किरकोळ चोऱ्याही वरचेवर घडतात. यामधील कित्येक प्रकार पोलीस ठाण्यापर्यंत येतच नाहीत. काही घटना नोंद होतात, तर काही नाहीत.
यामुळे इचलकरंजीच्या पोलीस यंत्रणेला जिल्ह्यात बदनामीच्या नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी आपापल्या गुन्हेशोध पथकासहित गतिमान चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला.
जंग-जंग पछाडले, तरी भुरट्या चोरट्यांशिवाय पोलीस ठाण्यातील या पथकांना ठोस अशी कामगिरी बजावता आली नाही. त्याचबरोबर अन्य गस्ती पोलिसांना चोऱ्या रोखण्यामध्येही यश आले नाही. त्यामुळे सहायक पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी यासंदर्भात बैठक घेतली. यामध्ये तिन्ही पोलीस ठाण्यांतील ‘डीबी’च्या पोलिसांना हद्दीचा बांध काढून टाकून संपूर्ण शहर व परिसरात तपास यंत्रणा राबविण्याची मुभा दिली आहे. त्यांच्याबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकालाही संलग्न केले आहे. त्यामुळे धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यासाठी ही योजना कितपत यशस्वी होते, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Local Crime Investigation Branch with DB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.