बेळगाव जिल्ह्यात २१ जूनपर्यंत लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:17 AM2021-06-11T04:17:53+5:302021-06-11T04:17:53+5:30
राज्य शासनाकडून गुरुवारी सायंकाळी लॉकडाऊनबाबत अधिकृत निर्णय घेण्यात आला. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन नियमावलीप्रमाणे २१ जूनपर्यंत हा लॉकडाऊन ...
राज्य शासनाकडून गुरुवारी सायंकाळी लॉकडाऊनबाबत अधिकृत निर्णय घेण्यात आला. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन नियमावलीप्रमाणे २१ जूनपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे.
सकाळी ६ ते १० या वेळेत गरजू वस्तू मिळतील. सुरू असलेल्या लॉकडाऊनप्रमाणे २१ जूनपर्यंत बेळगावात हा आणखी सात दिवसांचा वाढीव लॉकडाऊन असणार आहे.
नियमानुसार आणि लसीकरणासाठी लोकं घराबाहेर पडू शकतात.
बेळगावसह ८ जिल्ह्यांतील लाॅकडाऊनचा कालावधी वाढविण्यासंदर्भात मंत्री, अधिकारी आणि तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी गुरुवारी सकाळी दिली होती.
कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासंदर्भात बेळगावसह ८ जिल्ह्यांतील जिल्हा प्रशासनाशी आज गुरुवारी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली.
राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये लाॅकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. लाॅकडाऊनचा कालावधी वाढवायचा की नाही आणि वाढविला तर कोणकोणत्या गोष्टींना त्यामध्ये सवलत द्यावी यासंदर्भात सर्वांगाने सखोल चर्चा करून निर्णय घेतला आहे
सध्याच्या लाॅकडाऊनमुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी बेळगावसह अन्य ८ जिल्ह्यांतील संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी कोरोना मार्गदर्शक सूचींचे कडक पालन केले जावे, अशी सूचनाही त्यांनी केली. सदर जिल्ह्यातील संसर्ग रोखण्यासाठी सर्व त्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी तपासणी अहवाल शीघ्र उपलब्ध होण्यासाठी क्रम घेतले जावेत. पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपर्यंत कमी होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
बेळगाव हा गोवा आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील जिल्हा असल्यामुळे तसेच येथील पॉझिटिव्हिटी रेट ९ टक्क्यांच्या आसपास असल्याने काही ठराविक गोष्टींना मुभा देऊन येथील लाॅकडाऊन आणखी आठवडाभर वाढवावा, अशी विनंती यावेळी उपमुख्यमंत्री आणि जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
ऑटोमोबाइल, बांधकाम यासारख्या प्रमुख क्षेत्रांना सूट देऊन लाॅकडाऊन एका आठवड्यासाठी वाढवावा, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जिल्ह्यात १३५ वैद्यकीय पथकांद्वारे १३०० खेडेगावांमध्ये रॅपिड ॲंटिजन टेस्ट करण्यात आली असून याखेरीज इतर उपाय योजनांद्वारे पॉझिटिव्हिटी रेट ८.९ टक्क्यांपर्यंत कमी झाला असल्याचे कारजोळ यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगप्रसंगी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, प्रादेशिक आयुक्त अमलान आदित्य बिश्वास, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जि. प. सीईओ डॉ. दर्शन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, बीम्सचे संचालक डॉ. कुलकर्णी, मनपा आयुक्त जगदीश के. एच., उपविभागाधिकारी रवींद्र कर्लींगनावर, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. बाळकृष्ण तुक्कार आदींसह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.