लॉकडाऊनमुळे निराधार मुलांची सुरू आहे उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:24 AM2021-05-18T04:24:21+5:302021-05-18T04:24:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील बालकल्याण संकुल व जिल्ह्यातील अन्य संस्थातून अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर बाहेर पडलेल्या सुमारे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येथील बालकल्याण संकुल व जिल्ह्यातील अन्य संस्थातून अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर बाहेर पडलेल्या सुमारे १८० मुलांची उपासमार होत आहे. त्यांना अजून नोकरी नाही. कांहीजण किरकोळ हातावरील कामे करून शिक्षण घेत आहेत परंतु लॉकडाऊनमुळे सगळेच ठप्प झाल्याने त्यांच्या रोजच्या जेवणाचे वांदे झाले आहे. किमान एक महिन्यांसाठी त्यांना अन्नधान्याचे किट देण्याची गरज आहे. त्यासाठी बालकल्याण संकुलचे विश्वस्त व्ही. बी. पाटील व मानद कार्यवाह पद्मा तिवले यांनी मदतीचे आवाहन केले आहे.
ही सर्व मुले अनाथ, निराधार, निराश्रित आहेत. जगण्याच्या एका टप्प्यावर ती बालकल्याण संकुलसह विविध संस्थामध्ये आली. तिथे राहून त्यांचे उत्तम संगोपन व शिक्षणही झाले. परंतु राज्य शासनाच्या नियमानुसार ही मुले सज्ञान झाली की त्यांना संस्थेत राहता येत नाही. अशा घरट्यातून बाहेर पडलेल्या मुलांसाठीच आधाराची गरज आहे. ही मुले शिक्षण घेत अर्धवेळ नोकरी करत आहेत. कांहीजण अंगावरील कामे करून उपजीविका करत आहेत. मुली दवाखान्यात आया म्हणून काम करतात. कांहीजणी धुण्याभांड्याची कामे करतात. जळगांवचे दीपस्तंभ फाऊंडेशन, पुण्यातील सनाथ वेल्फअर फाऊंडेशन व ठाणे येथील अविशत ट्रस्ट यांनी आतापर्यंत महिनाभर पुरेल इतकी मदत दिली. परंतु अजूनही एका महिन्याचे अन्नधान्याचे किट देण्याची गरज आहे. त्यामध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, खाद्यतेल, डाळ, कडधान्ये, साखर, चहापूड, चटणी, कांदे-बटाटे व साबण हे साहित्य असेल. महिलांसाठी सॅनिटेशनचे दोन पॅड दिले जातील. समाजातील ज्या दानशूर व्यक्तींना मदत करायची आहे, त्यांनी बालकल्याण संकुल (०२३१-२६२५४२९) किंवा पद्मा तिवले (मो-९८२३१९२९६३) यांच्याशी संपर्क साधावा. जमा झालेली मदत प्रत्यक्ष लाभार्थींच्या हातात दिली जाणार आहे.