लॉकडाऊनचा निर्णय आठ तासांत मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:41 AM2021-05-05T04:41:47+5:302021-05-05T04:41:47+5:30
कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीनंतर लगेचच बुधवारपासून लॉकडाऊनच्या निर्णयावरून समाजमाध्यमांवर टीकेचा भडिमार झाल्यानंतर मंगळवारी आठ तासांतच हा निर्णय मागे घेण्यात ...
कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीनंतर लगेचच बुधवारपासून लॉकडाऊनच्या निर्णयावरून समाजमाध्यमांवर टीकेचा भडिमार झाल्यानंतर मंगळवारी आठ तासांतच हा निर्णय मागे घेण्यात आला. लॉकडाऊन नाही तर नागरिकांनी १३ तारखेपर्यंत उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेली गोकुळची निवडणूक नुकतीच पार पडली. मंगळवारी मतमोजणी सुरू झाल्यानंतर सकाळी दहा वाजता जिल्ह्यातील तीनही मंत्री व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत बुधवारी सकाळी अकरा वाजेपासून कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. दुपारी साडेतीन वाजता याबाबतची बातमीदेखील माहिती कार्यालयाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर कोल्हापूरकरांनी संताप व्यक्त करीत फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्ॲपवर टीका करायला सुरुवात केली, गोकुळ निवडणुकीवरून सर्वच राजकीय नेत्यांना शेलक्या भाषेत ट्रोल करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता पालकमंत्री सतेज पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते, त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. तीनही मंत्र्यांच्या वतीने याबाबतचे पत्रक प्रसिद्ध करून नागरिकांना १३ तारखेला सकाळी सात वाजेपर्यंत उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---
हे आहेत नियम
-अत्यावश्यक सेवा, वैध कारण, तातडीच्या वैद्यकीय गरजेशिवाय घराबाहेर पडू नये
-वैद्यकीय सुविधा व सेवा पूर्णवेळ सुरू ठेवाव्यात.
-अत्यावश्यक सेवा, किराणा दुकाने, बेकरी सकाळी सात ते अकरा या वेळेत उघडी राहतील. मात्र, नागरिकांनी दुकानात न जाता घरपोच सेवा मागवावी. अत्यावश्यक बाब नसेल तर वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडू नये.
-हॉटेल्स, रेस्टॉरंट यांनी फक्त घरपोच सेवा द्यावी.
-शेती व शेतीशी निगडित व मान्सूनपूर्व कामे सुरू ठेवावीत.
-अत्यावश्यक, निर्यात, निरंतर प्रक्रिया उद्योग आस्थापना यापूर्वीच्या नियमास बांधील असतील.
---
नेमके काय बदलले?
लॉकडाऊनचा निर्णय मागे घेताना दिलेली नियमावली व सध्या संचारबंदीअंतर्गत सुरू असलेल्या नियमावलीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सर्व व्यवहार ‘जैसे थे’ ठेवून नागरिकांना घराबाहेर न पडता घरपोच सेवा मागवावी असे सांगण्यात आले आहे. मग जनता कर्फ्यू हे नाव देऊन नेमके काय बदलणार आहे आणि काय साधले जाणार आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.