लॉकडाऊनमुळे कचरा संकलनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:22 AM2021-05-01T04:22:05+5:302021-05-01T04:22:05+5:30
जयसिंगपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे. याचा परिणाम शहरातील कचरा संकलनावर झाला ...
जयसिंगपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे. याचा परिणाम शहरातील कचरा संकलनावर झाला आहे. तीन ते चार टन कचऱ्याची घट दिसून येत आहे. बाजार, हॉटेल्स बंदमुळे कचरा संकलन कमी होत आहे.
जयसिंगपूर शहरात बारा प्रभाग असून, घंटागाड्याद्वारे ओला व सुका कचरा संकलित केला जातो. जवळपास सोळा टन कचरा दररोज गोळा होतो. दैनंदिन भरणारा बाजार, आठवडा बाजार, किरकोळ विक्रेत्यांकडून रस्त्यावर टाकण्यात येणारा कचरा, पालिकेला उचलावा लागत होता. दरम्यान, १५ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे आणि फिरून भाजीपाला विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे कचरा संकलनात कचरा कमी झाला आहे. शिवाय हॉटेल्सवरदेखील मर्यादा आल्यामुळे त्याचाही परिणाम झाला आहे. जवळपास तीन ते चार टन कचरा कमी झाला आहे.
सार्वजनिक ठिकाणी दैनंदिन स्वच्छता होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाय, स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करावी, अशीदेखील मागणी होत आहे. आरोग्य विभागाने संबंधित ठेकेदारांना सूचना द्याव्यात, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.