लॉकडाऊनमध्ये ग्रामस्थांनी तयार केले तब्बल नऊ किलोमीटरचे रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:32 AM2021-06-09T04:32:16+5:302021-06-09T04:32:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अंगापूर : लॉकडाऊनमध्ये अंगापूर तर्फ तारगाव (ता. सातारा) या गावाने आपल्या एकीचे दर्शन घडवत कोणत्याही शासकीय ...

In the lockdown, the villagers built nine kilometers of roads | लॉकडाऊनमध्ये ग्रामस्थांनी तयार केले तब्बल नऊ किलोमीटरचे रस्ते

लॉकडाऊनमध्ये ग्रामस्थांनी तयार केले तब्बल नऊ किलोमीटरचे रस्ते

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अंगापूर : लॉकडाऊनमध्ये अंगापूर तर्फ तारगाव (ता. सातारा) या गावाने आपल्या एकीचे दर्शन घडवत कोणत्याही शासकीय मदतीची अपेक्षा न करता गावशिवारातील तब्बल नऊ किलोमीटरचे चार रस्ते एका महिन्यात मुरमीकरण व मजबुतीकरण करत स्वखर्चाने तयार केले. अनेक पिढ्यांपासून असलेली शेतीची व स्वत:ची फरपट इतिहासजमा केली.

मुळातच गावची बागायती, काळवट व सुपीक जमीन पावसामुळे चिखलमय होत असे. चालत जाणेही अशक्य असताना वाहने कशी जाणार? त्यामुळे गेली कित्येक वर्षे या परिसरातील शेतमाल शेतकऱ्यांच्या घरी पोहोचताना नाकीनऊ होत होते. पावसाळ्यात कित्येक वेळा पिके तिथेच कुजून नष्ट होत होती. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान शेतकरी सहन करत होते. ऊसतोडणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर तर ग्रामस्थांना अग्निदिव्यच करावे लागत होते. रस्ता नीट नसल्यामुळे सडणारे पीक व होणारे नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय दुसरा पर्याय ग्रामस्थांकडे नव्हता.

कोरोनामुळे जाहीर झालेला लॉकडाऊन आणि उन्हाळ्यात शेतीची कामे कमी असल्याने गावातील लोकांकडे भरपूर वेळ होता. या वेळेत काहीतरी शाश्वत काम करावे जेणेकरून गावाचा एखादा प्रश्न कायमचा मिटला जाईल, या विचाराने अंगापूर ग्रामस्थांची कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्यासमवेत बैठक झाली. त्यात पाणंद व शेतशिवार रस्ते दुरुस्तीचा विषय घेण्यात आला. या बैठकीत रस्त्यांचा प्रश्न कायमचा सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामाला लगेच प्रारंभ करण्यात आला. रस्त्यांच्या आजूबाजूला व दुतर्फा शेती असणाऱ्या प्रत्येकाकडून प्रतिगुंठा पन्नास रुपयांप्रमाणे रक्कम जमा करण्यात आली. हे काम मोठे असल्याने यंत्रसामग्री आवश्यक होती. यासाठी आमदार शिंदे यांनी पोकोन मशीन स्वखर्चाने देत मोठा अडथळा दूर केला. त्यामुळे तर गावकऱ्यांनी हाती घेतलेल्या कामाला मोठे बळच मिळाले. गावातील जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर वाहने वापरायला दिली. तब्बल एक महिनाभर चाललेल्या या कामाने अनेक वर्षांची फरपट थांबवली. गावकऱ्यांनी दोन पाणंद तर दोन कालव्यावरील असे चार रस्ते तयार करून मुख्य रस्त्यांना जोडले.

------------------------------------

रस्त्याचा लेखाजोखा..

लोकसहभाग रकमेतून : सात लाख रुपये

सहभागी वाहनांसाठी डिझेल : दररोज खर्च २५ ते ३० हजार

------------------------------------

यंत्रणा

१ पोकलेन, १ जेसीबी, ३ डंपर, २० ट्रॅक्टर

------------------------------------

कालावधी

३० दिवस

------------------------------------

पाणंद रस्त्यामुळे होणार फायदा

- वाहनांचे बारमाही दळणवळण होण्यामुळे शेतीत तरुणांचा सहभाग वाढणार

- ऊसतोड वेळेत झाल्यास खर्च वाचणार

- पावसाळ्यातही सोयाबीन, अन्य पिके घेता येणार

- शेतीची मशागत, खते, जनावरांचा चारा ने-आण करण्यास सोईस्कर होणार

- शेळीपालन, कुक्कुटपालन, गाई, म्हशी पालन या शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळणार

- गावच्या आर्थिक सुबत्तावाढीला चालना मिळणार

------------------------------------

कोट.....

गेल्या अनेक वर्षांपासून पाणंद रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गावातील अनेक शेतकऱ्यांनी खस्ता खाल्ल्या, नुकसान सहन केले. आता मात्र गावकऱ्यांच्या सहभागातून तयार झालेल्या या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांच्या नव्या पिढीच्या मरणयातना संपून शेतीच्या नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.

- जयवंत शेडगे, ज्येष्ठ नागरिक, अंगापूर तर्फ तारगाव

------------------------------------

फोटो: ०७ सातारा ०१

अंगापूर तर्फ तारगाव ग्रामस्थांनी लाॅकडाऊन काळात एकजुटीने मुरमीकरण करून पाणंद रस्ता तयार केला.

Web Title: In the lockdown, the villagers built nine kilometers of roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.