उपायुक्त कार्यालयास ठोकले कुलूप
By admin | Published: April 21, 2016 12:54 AM2016-04-21T00:54:29+5:302016-04-21T00:54:29+5:30
खोराटे फैलावर : संतप्त नगरसेवकांनी खुर्ची फेकली; प्राध्यापकांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचा आक्षेप
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तसेच उपोषणाला बसल्यानंतरही त्याची दखल न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी बुधवारी दुपारी उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या नगरपालिकेतील कार्यालयास कुलूप ठोकले. शिवाय त्यांची खुर्चीही बाहेर फेकली. त्याचबरोबर उपायुक्त विजय खोराटे यांनाही फैलावर घेतले.
केएमसी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या नियुक्तीस शिवाजी विद्यापीठाने मान्यता दिली असताना तसेच पूर्वीच्या बैठकीत प्राध्यापकांचा विषय निकाली काढावा, असे ठरले असतानाही अधिकारी न्याय देण्यास टाळाटाळ करत आहेत, म्हणून काही प्राध्यापक उपोषणाला बसले आहेत.
एकाची प्रकृती मंगळवारी बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल केले, तरीसुद्धा प्रशासनाने त्यांची विचारपूसही न केल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संतप्त नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली; परंतु ते उपस्थित नव्हते. फोनवर संपर्क साधल्यानंतर गाडी पंक्चर झाल्याने त्यांनी अर्ध्या तासाने येत असल्याचे सांगितले. नगरसेवकांनी गाडीच्या चालकाशी संपर्क साधला तर त्याने मी साहेबांच्या घरी आहे, ते बाहेरगावी गेल्याचे सांगितले. त्यामुळे नगरसेवक आणखी चिडले. अखेर स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, गटनेते शारंगधर देशमुख, शिक्षण सभापती अजिंक्य चव्हाण, महेश सावंत, तौफिक मुल्लाणी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर,आदिल फरास यांच्यासह वीस ते पंचवीस नगरसेवकांनी उपायुक्त विजय खोराटे यांच्या कार्यालयात अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना बोलावून घेतले.
खोराटे यांच्यावरचा राग त्यांच्यावर काढत रिक्त पदे का भरत नाहीत, असा जाब विचारला. उपायुक्त खोराटे यांच्याही कारभाराचा त्यांनी पंचनामा केला. खोराटे स्पष्ट शेरा मारत नाहीत, मग फाईल का पाठविता, असे विचारले. प्रा जयंत पाटील यांनी तर खोराटे यांचा ‘एकेरी शब्द’ वापरून अवमान केला. तासभर सर्वांनी खोराटे यांच्यावर तोंडसुख घेतले. दरम्यान, उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे आले नाहीत. त्यामुळे संतप्त नगरसेवक पुन्हा त्यांच्या कार्यालयात घुसले आणि त्यांची खुर्ची बाहेर फेकली. ढेरे येणार नाहीत असे कळताच त्यांच्या कार्यालयास कुलूप ठोकण्यात आले.
नितीन देसार्इंचा अवमान
उपायुक्त विजय खोराटे यांच्या कार्यालयात अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई आले, तेव्हा त्यांना खुर्ची देणे अपेक्षित होते; परंतु खोराटे यांनी ती दिली नाही. हा देसाई यांचा अवमान आहे, असे समजून राजेश लाटकर, जयंत पाटील यांनी खोराटेंना झापले.