मतदान यंत्रे कुलूपबंद: कडेकोट पहारा, स्ट्राँगरूममध्ये जमा: ‘सीपीएफ’चा खडा पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 11:53 AM2019-04-25T11:53:52+5:302019-04-25T11:55:57+5:30
१७ व्या लोकसभेत कोल्हापूर व हातकणंगलेचे खासदार कोण असणार, हे ठरविणारी मतदान यंत्रे बुधवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत कोल्हापुरात दाखल झाली. रात्रभर मशीन सील करून बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ती रमणमळा व राजाराम तलाव येथील शासकीय गोदामांत तयार केलेल्या स्ट्राँगरूममध्ये कुलूपबंद करण्यात आली.
कोल्हापूर : १७ व्या लोकसभेत कोल्हापूर व हातकणंगलेचे खासदार कोण असणार, हे ठरविणारी मतदान यंत्रे बुधवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत कोल्हापुरात दाखल झाली. रात्रभर मशीन सील करून बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ती रमणमळा व राजाराम तलाव येथील शासकीय गोदामांत तयार केलेल्या स्ट्राँगरूममध्ये कुलूपबंद करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक निरीक्षक व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सील करून या स्ट्राँगरूम सेंट्रल पोलीस फोर्सच्या ताब्यात देण्यात आल्या. आता महिनाभर यावर या यंत्रणेचा खडा पहारा राहणार आहे.
मंगळवारी (दि. २३) मतदान झाल्यानंतर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांतील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानयंत्राच्या पेट्या मंगळवारी रात्रीच १२ ते एक या वेळेत सहायक निवडणूक कक्षात जमा झाल्या. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता करवीर मतदारसंघातील पेट्या सर्वप्रथम जमा झाल्या.
हे काम दिवसभर सुरू होते. पेट्या घेऊन येणारा शेवटचा ट्रक हातकणंगले मतदारसंघातील शिराळा विधानसभा मतदारसंघातून दुपारी साडेतीनच्या सुमारास आला. ही यंत्रे घेऊन येणाऱ्या ट्रकना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली होती. त्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्तही देण्यात आला होता.
या पेट्या एकत्र आल्यानंतर हातकणंगले मतदारसंघासाठी राजाराम तलाव येथे तयार केलेल्या स्ट्राँगरूममध्ये, तर कोल्हापूरच्या पेट्या रमणमळा येथील शासकीय गोदामातील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्याची प्रक्रिया चार वाजल्यापासून सुरू झाली. साडेसहाच्या सुमारास या सर्व पेट्या ठेवल्यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह निवडणूक निरीक्षक, निवडणूक अधिकारी, राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही स्ट्राँगरूम सील करण्यात आली.
कडेकोट पहारा
स्ट्राँगरूमवर आजपासून २३ मेपर्यंत महिनाभर सुरक्षेचा कडकोट पहारा राहणार आहे. ३२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर या रूमच्या आत व बाहेर अहोरात्र असणार आहे. या रूमची सर्व सुरक्षा सेंट्रल पोलीस फोर्स व राज्य राखीव दलाकडे असणार आहे. नायब तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असणारे पथक यासाठी तैनात करण्यात आले असून ते आठ तासांप्रमाणे तीन शिफ्टमध्ये तेथे उपस्थित असणार आहेत.
सहायक निवडणूक अधिकारी, तहसीलदार हे महिनाभर रोज सकाळी व संध्याकाळी असे दोन टप्प्यांत जाऊन सुरक्षेची पाहणी करून भेट पुस्तिकेत नोंद करणार आहेत. जिल्हाधिकारी या सर्व सीसीटीव्हीचे रोजचे फुटेज पाहून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय रात्रभर जागे
जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रभर या पेट्या सील करण्याचे काम सुरू होते. बुधवारी सकाळी सहा वाजता हे काम संपवूनच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी आपापल्या घरी परतले. तासाभराच्या विश्रांतीनंतर ते परत जिल्हाधिकारी कार्यालयात आले. रात्रभर कार्यालय जागेच राहिले. तब्बल ३६ तासांहून अधिक काळ हे अधिकारी व कर्मचारी हे काम अविरतपणे करत होते.
राजकीय पक्षांना तंबू लावता येणार
ईव्हीएमच्या सुरक्षेवरून तक्रारी येत असल्याने निवडणूक आयोगाने स्ट्राँगरूमच्या परिसरात जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने स्वत:चा तंबू घालण्याची मुभा राजकीय पक्षांना देण्यात आली आहे. मात्र पक्षांनी स्वखर्चाने हे तंबू उभारायचे आहेत.