मणिकर्णिकेवरील लॉजचे अतिक्रमण हटवणार : खुदाईचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 05:13 PM2021-03-16T17:13:32+5:302021-03-16T17:16:04+5:30
Mahalaxmi Temple Kolhapur- अंबाबाई मंदिर परिसरातील मणिकर्णिका कुंडावर करण्यात आलेले १० बाय १० फूट अतिक्रमण काढून घेण्याची तयारी माउली लॉजचे मालक रमेश आंबर्डेकर यांनी दाखवली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी शिवसेनेला पाठवले असून आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती केली आहे.
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरातील मणिकर्णिका कुंडावर करण्यात आलेले १० बाय १० फूट अतिक्रमण काढून घेण्याची तयारी माउली लॉजचे मालक रमेश आंबर्डेकर यांनी दाखवली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी शिवसेनेला पाठवले असून आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती केली आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने सध्या अंबाबाई मंदिर परिसरातील मणिकर्णिका कुंडाच्या खुदाईचे काम सुरू असून कुंडाची १० फूट बांधणी माउली लॉजच्या खाली आहे. मालकांनी हे अतिक्रमण काढून घ्यावे असे समितीने लॉज मालकांना सांगितले होते.
मात्र त्यांनी या भागातील खुदाईवर न्यायालयातून स्थगिती आणली होती. त्यामुळे येथील काम थांबले होते, ही बाब देवस्थान समितीने पत्रकार परिषद घेऊन जाहीर केल्यानंतर शिवसेनेच्यावतीने लॉजच्या दारात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी हे अतिक्रमण हटवा अन्यथा आम्ही हटवू, असा इशारा देण्यात आला होता. यावेळी झालेल्या चर्चेत मालकांनी याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते.
लॉजचे मालक रमेश आंबर्डेकर यांनी जिल्हा प्रमुख संजय पवार यांना पत्र पाठवले असून त्यात लॉजच्या ऑफिसची १० बाय १० फूट जागा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला देत आहोत. तरी आपले आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती केली आहे. त्यामुळे समितीला येथील खुदाई करता येणार आहे.