महाडिक-मालोजीराजेंची ‘ताराराणी’ला रसद

By admin | Published: August 12, 2015 12:29 AM2015-08-12T00:29:51+5:302015-08-12T00:29:51+5:30

काँग्रेसमधील बेदिली : पी. एन., सतेज पाटील यांच्यावरच भिस्त; पक्षीय पातळीवरून समेटासाठी प्रयत्न करणार

Logistics to Mahadik-MalojiRajeni 'Tararani' | महाडिक-मालोजीराजेंची ‘ताराराणी’ला रसद

महाडिक-मालोजीराजेंची ‘ताराराणी’ला रसद

Next

भारत चव्हाण - कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वातावरण चांगले असतानाही केवळ पक्षांतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचे चार नेते एकत्र येणे अवघड असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. पक्षाचे आमदार महादेवराव महाडिक व माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी निवडणुकीपासून ‘दोन हात लांब’ राहण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी त्यांच्या समर्थकांनाही मोकळीक दिली आहे. महाडिक व मालोजीराजे यांची भूमिका ताराराणी आघाडीच्या राजकारणाला बळ देणारीच आहे.
आमदार महाडिक हे निवडणुकीत तटस्थ राहणार म्हणजे ताराराणीला मदत करणार हे स्पष्टच आहे. मालोजीराजे यांनी स्वत: अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यांनी कार्यकर्त्यांसाठी ताराराणी आघाडीकडे पाच जागा मागितल्या आहेत. तुम्ही स्वत: आमच्यासाठी प्रचाराला फिरणार असाल तरच आम्ही काँग्रेसची उमेदवारी घेतो अन्यथा काँग्रेसकडून उभे राहावे असा आग्रह धरू नका, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे होते. त्याची दखल घेऊन त्यांनी समर्थकांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. जरी हे दोघे तटस्थ राहिले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांना मदत करावी लागणारच आहे. त्यामुळे त्यांची अप्रत्यक्ष मदत ही ताराराणीलाच होईल, असे दिसते. महाडिक व मालोजीराजे यांनी अद्याप उघडपणे कोणतीही प्रतिक्रिया अथवा भूमिका घेतली नसली तरी त्यांच्या समर्थकांचा कोणाशी संपर्क झाला आहे यावरून राजकारण स्पष्ट होत आहे.
माजी मंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी रात्री काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या घरी जाऊन भेट घेतली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तशी ही पहिलीच थेट भेट होती. त्यामुळे उभयतांमध्ये काय चर्चा झाली, हा काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्सुकतेचा विषय आहे. पाच महिन्यांपूर्वी मुंबईत काँग्रेसच्या प्रदेश कार्र्यालयात जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला गेला होता. त्याच बैठकीत महापालिकेच्या निवडणुकीत पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक, सतेज पाटील, प्रल्हाद चव्हाण, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष संध्या घोटणे, आदींनी एकत्र येऊन रणनीती ठरवावी आणि या सर्वांचे समन्वय माजी मंत्री पतंगराव कदम यांनी ठेवावे असे ठरले होते, पण त्यानंतर कोणीही थेट भेटले नव्हते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस समिती कार्यालयात सतेज पाटील यांनी बैठक घेतली, परंतु या बैठकीला पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक, मालोजीराजे यांच्यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. त्यानंतरसुद्धा कसलाही विषय प्रतिष्ठेचा न करता सतेज पाटील यांनी सोमवारी पी. एन. पाटील यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि कशाप्रकारे रणनीती ठरवावी या अनुषंगाने चर्चा केली. चर्चेत आमदार महाडिक व मालोजीराजेंच्या भूमिकेचा मुद्दा आला. पी. एन. पाटील यांनी ते दोघेही कॉँग्रेससोबत असतील, असे सांगितले. त्याचवेळी पी. एन. यांनी आधी महाडिक यांच्याशी बोलणे केले. त्यानंतर मालोजीराजे यांच्याशी चर्चा केली. या नेत्यांमध्ये फोनवर काय बोलणे झाले हे अद्याप स्पष्टपणे बाहेर आले नसले, तरी दोघांनीही यावेळी निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा पुढे आली.

२० आॅगस्टला मेळावा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २० आॅगस्टला दुपारी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. स्वर्गीय राजीव गांधी जयंतीनिमित्त आयोजित ‘राजीव गांधी सद्भावना दौड’च्या निमित्ताने कोल्हापुरात येणारे काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, माजी मंत्री पतंगराव कदम ही मंडळी मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

झगडावे लागणार
गेल्या पाच वर्षांत महानगरपालिकेत काँग्रेसचे ३३ नगरसेवक निवडून आले होते. त्यामध्ये काही नगरसेवक पी. एन. पाटील व मालोजीराजे यांचे होते, परंतु नेतृत्व मात्र एकट्या सतेज पाटील यांनीच केले. पाच वर्षांत त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे झाली. मोठ्या प्रमाणात राज्य व केंद्र सरकारकडून निधी आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, तरीही पक्षांतर्गत खदखद अद्याप न संपल्यामुळे काँग्रेसची अवस्था दृष्ट लागल्यासारखी झाली आहे. त्यामुळेच काँग्रेसला निवडणुकीत बरेच झगडावे लागणार आहे.

Web Title: Logistics to Mahadik-MalojiRajeni 'Tararani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.