एएस ट्रेडर्सचा प्रमुख लोहितसिंगने एक कोटीची हिऱ्याची अंगठी सांगलीत विकली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 11:53 AM2023-10-06T11:53:56+5:302023-10-06T11:54:33+5:30

तपासात फॉरेन्सिक ऑडिटरची मदत घेणार

Lohit Singh head of AS Traders sold a diamond ring worth one crore in Sangli | एएस ट्रेडर्सचा प्रमुख लोहितसिंगने एक कोटीची हिऱ्याची अंगठी सांगलीत विकली

एएस ट्रेडर्सचा प्रमुख लोहितसिंगने एक कोटीची हिऱ्याची अंगठी सांगलीत विकली

googlenewsNext

कोल्हापूर : एएस ट्रेडर्स कंपनीने केलेल्या फसवणुकीची व्याप्ती मोठी आहे. यातील तांत्रिक बाबी समजून घेण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटरची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू आहे. तसेच, एका बड्या नेत्याच्या मुलाने कंपनीचा प्रमुख लोहितसिंग सुभेदार याच्याकडून उकळलेल्या पैशांची चौकशी करण्यासाठी ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळली जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. दरम्यान, त्याने एक कोटीची हिऱ्याची अंगठी सांगलीतील एका सराफाला विकल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.

एएस ट्रेडर्स कंपनीने गुंतवणूक घेताना कोट्यवधी रुपये रेकॉर्डवर दाखवलेले नाहीत. ट्रेडिंगसाठी घेतलेले पैसे अन्य ठिकाणी गुंतवले. संचालकांमधील समन्वयाचा अभाव आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात अनेक गोष्टी लपवण्याचा प्रयत्न झाला. गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या रकमा, त्यांना दिलेले परतावे, कंपनीने ठिकठिकाणी केलेली गुंतवणूक, परदेशी सहली, सेमिनार्सवर कंपनीने उडवलेले पैसे, एजंटांना दिलेली वाहने, फ्लॅट याची माहिती कंपनीचे संगणक, लॅपटॉपवर उपलब्ध आहे.

पोलिसांनी तपासादरम्यान अनेक हार्ड डिस्क, लॅपटॉप, फोन जप्त केले आहेत. याची तपासणी करण्यासाठी पोलिसांना फॉरेन्सिक ऑडिटरची गरज आहे. फॉरेन्सिक ऑडिटर मिळावा, अशी मागणी पोलिस अधीक्षकांनी वरिष्ठ कार्यालयाकडे केली आहे.

फॉरेन्सिक ऑडिटरची दुसऱ्यांदा मागणी

एएस ट्रेडर्सच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी यापूर्वीही फॉरेन्सिक ऑडिटरची मागणी केली होती. मात्र, गृह विभागाने नियुक्त केलेल्या ऑडिटरने काम करण्यास असमर्थता दर्शवली, यामुळे दुसऱ्यांदा फॉरेन्सिक ऑडिटरची मागणी करण्यात आली आहे.

फॉरेन्सिक ऑडिट म्हणजे काय?

देश-विदेशात कंपनीचा विस्तार आहे. त्यांच्याकडील जमा-खर्चाच्या नोंदी, ठिकठिकाणचे संगणक, हार्ड डिस्क, लॅपटॉप, मोबाइलमध्ये आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने यातील माहिती जमा करून त्याचे योग्य विश्लेषण करणे म्हणजे फॉरेन्सिक ऑडिट.

ऑडिओ क्लिपमुळे खळबळ

अटकेतील लोहितसिंग याच्याशी संबंधित असलेली एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली. याबाबत पोलिस अधीक्षकांना विचारणा केली असता, संबंधित क्लिपची सत्यता पडताळून पुढील चौकशी केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

हिऱ्याचा शोध सुरू

लोहितसिंगने एका मध्यस्थाकरवी त्याची एक कोटीची हिऱ्याची अंगठी सांगलीतील सराफाला विकली होती. सराफाने त्यातील हिरा काढून तो ८० लाखांना विकला. हिरा खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पसार असलेल्या काळात मदत केल्याबद्दल लोहितसिंगने कमी पैशात अंगठी विकल्याची चर्चा आहे.

Web Title: Lohit Singh head of AS Traders sold a diamond ring worth one crore in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.