लोकसभेसाठी ‘के. पीं.’ची चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 01:12 AM2018-09-17T01:12:23+5:302018-09-17T01:12:26+5:30
राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासह राष्टÑवादी पक्षांतर्गत होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राष्टÑवादी कॉँग्रेसने खासदार धनंजय महाडिक यांना पर्यायी उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. यातूनच बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांचे नाव पुढे आले आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार हे महाडिक यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असले तरी खासदार महाडिक, प्रा. संजय मंडलिक आणि के. पी. पाटील अशी तिरंगी लढतीत ‘पाटील’च कशी बाजी मारू शकतात, याचे गणितच त्यांनी पवार यांच्यासमोर मांडले आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. या विजयामागे त्यांचे दहा वर्षांचे कष्ट जरी असले तरी दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना दिलेली साथही तितकीच महत्त्वाची होती. निवडणुकीनंतर राजकारणाचे संदर्भ बदलत गेले. त्यामुळे महाडिक पक्षापासून, तर स्थानिक नेत्यांसह कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावत गेले. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी घेतलेली सावध भूमिकाच त्यांना आता अडचणीची ठरू लागली आहे. मध्यंतरी भाजपचे लोकसभेचे उमेदवार अशी चर्चाही उघड केली जायची. गेल्या निवडणुकीत महाडिक यांच्या विजयासाठी ज्यांनी जिवाचे रान केले, तेच आमदार हसन मुश्रीफ त्यांची उमेदवारी कापण्यासाठी सरसावले आहेत. त्यातूनच मुश्रीफ यांनी प्रा. संजय मंडलिक यांना पक्षात घेण्याच्या हालचाली मध्यंतरी केल्या; पण प्रा. मंडलिक शिवसेना सोडण्याच्या मन:स्थितीत दिसत नसल्याने मुश्रीफ यांची गोची झाली आहे. महाडिक यांना विरोध करायचा तर दुसरा तगडा उमेदवार कोण? हे पक्षश्रेष्ठींना सांगावे लागणार आहे. त्या दृष्टीने गेले तीन-चार महिने पक्षांतर्गत घुसळण सुरू आहे.
महाडिक यांना पक्षांतर्गत विरोध असला तरी संसदेतील आक्रमक कामामुळे त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. या बळावरच जिल्ह्णातील नेत्यांनी कितीही विरोध केला तरी उमेदवारी आपणालाच मिळणार, असा महाडिक यांना आत्मविश्वास आहे; पण गेल्या तीन-चार महिन्यांपासून पक्षांतर्गत हालचाली गतिमान झाल्या आहेत. महाडिक यांना उमेदवारी दिली तर सतेज पाटील ताकदीने विरोध करणार, त्यातच पक्षांतर्गत विरोधाचा फटकाही बसू शकतो, हे पक्षश्रेष्ठींना पटवून सांगितले जात आहे. आठवड्यापूर्वी मुंबईत राष्टÑवादीच्या प्रमुख नेत्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन वस्तुस्थिती विशद केली. ‘महाडिक नको तर मुश्रीफ यांनी उभे राहावे,’ असा आग्रह पक्षाध्यक्ष पवार यांचा आहे; पण मुश्रीफ तयार नसल्याने के. पी. पाटील यांचे नाव पुढे आले. करवीर, कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या ‘बिद्री’ कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. त्या माध्यमातून त्यांचा संपर्क आहे. त्यांना कॉँग्रेसची साथ मिळाली तर त्यांचा विजय सोपा होऊ शकतो.
महाडिक यांना डावलले तर त्यांची भूमिका काय राहू शकते, याबाबतही या बैठकीत चाचपणी करण्यात आली. महाडिक यांच्यासमोर भाजपशिवाय पर्याय राहणार नाही; पण शिवसेना-भाजपची युती झाली तर ही जागा शिवसेनेला जाणार आहे. त्यामुळे पुरस्कृत अपक्ष म्हणून ते रिंगणात राहू शकतात. शिवसेनेकडून प्रा. मंडलिक, अपक्ष महाडिक व दोन्ही कॉँग्रेसकडून के. पी. पाटील उभे राहिले तर पाटील विजयापर्यंत कसे पोहोचू शकतात, यांचा ठोकताळाच त्यांनी पक्षाध्यक्षांसमोर मांडल्याचे सूत्रांकडून समजते. उमेदवारीचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार हे जरी घेणार असले तरी स्थानिक बेरीज-वजाबाकीच्या राजकारणावर बरेच अवलंबून राहणार, हे निश्चित आहे.
मुश्रीफ यांच्या गुगलीमागील राजकारण
राष्टÑवादी कॉँग्रेसच्या गणराया अवॉर्ड वितरण कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर ‘आपण लोकसभेला उभे राहावे, असा के. पी. पाटील यांचा आग्रह’ असल्याची गुगली मुश्रीफ यांनी टाकली. आपले नाव चर्चेत सोडून त्यांनी मतदारसंघाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यामागे ‘के. पीं.’चे नाव दडले होते.
सतेज पाटील यांच्या शब्दाचे काय?
संजय मंडलिक कोणत्याही पक्षातून उभे राहिले तरी त्यांना मदत करून २०१४ ची चूक दुरुस्त करणार, असा सतेज पाटील यांनी जाहीररीत्या शब्द दिला आहे. त्यामुळे राष्टÑवादीने उमेदवार बदलला तर पाटील त्या उमेदवाराला मदत करणार का? हेही महत्त्वाचे राहणार आहे.