Lok Sabha Election 2019 : चंद्रकांत पाटील म्हणतात, वसंतदादा घराण्याच्या बंडखोरीत माझाच हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 03:57 PM2019-03-28T15:57:29+5:302019-03-28T16:10:40+5:30
राज्याच्या राजकारणात ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात त्यात माझा हात असतो. वसंतदादा घराण्यात झालेल्या बंडखोरीच्या घटनेमागेही माझाच हात आहे. मी चांगल्या गोष्टीतील सहभाग नाकारत नाही, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सांगली : राज्याच्या राजकारणात ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात त्यात माझा हात असतो. वसंतदादा घराण्यात झालेल्या बंडखोरीच्या घटनेमागेही माझाच हात आहे. मी चांगल्या गोष्टीतील सहभाग नाकारत नाही, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सांगली लोकसभा मतदारसंघासाठी खासदार संजयकाका पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आमच्या उमेदवाराविरोधात उभारण्यासाठी कॉंग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही. सांगलीच्या जागेंसाठी कॉंग्रेसेकडे उमेदवार नसल्याने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडेही चांगला उमेदवार नाही.
त्यामुळे भाजपचा याठिकाणचा विजय निश्चित झाला आहे. वसंतदादा घराण्याने बंडखोरीचा इशारा दिला असेल आणि त्यामागे माझा हात असल्याची चर्चा केली जात असेल तर मी त्या गोष्टी स्वीकारत आहे. अशा चांगल्या गोष्टीत माझा हात नक्कीच असतो.
जयंत पाटील यांनी भाजपमध्ये आयात उमेदवारांचीच गर्दी असल्याची व भाजपची स्वत:ची ताकद कुठेही दिसत नसल्याची टीका केली होती. त्यास उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना आजवर त्यांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना सांभाळता आले नाही. त्यांना योग्य न्यायसुद्धा देता आला नाही. त्यामुळे असे नाराज झालेले लोक भाजपमध्ये समाधानाने येत आहेत. जयंत पाटील यांनी आता भाजपच्या ताकदीवर बोलण्यापेक्षा आहे ते लोक सांभाळण्याचे काम केले तर ते त्यांच्यासाठी चांगले आहे.
आम्ही उमेदवार विकत घेऊ, नाहीतर फुकट!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांना घोटाळ््याच्या पैशातून विकत घेतले आहे का, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्ही उमेदवार विकत घेऊ, नाहीतर फुकट घेऊ. तो आमचा व्यक्तीगत प्रश्न आहे. आम्हाला काय मिळते यापेक्षा शेट्टी यांना आता किती जागा लोकसभेच्या मिळणार, याची चिंता करावी.