Lok Sabha Election 2019 चिक्कोडी कुरुक्षेत्रावर हुक्केरी विरूद्ध ज्वोल्ले लक्षवेधी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:41 PM2019-04-16T23:41:54+5:302019-04-16T23:42:12+5:30
विलास घोरपडे । लोकमत न्यूज नेटवर्क संकेश्वर : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. मात्र, खरा ...
विलास घोरपडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
संकेश्वर : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. मात्र, खरा सामना काँगे्रसचे प्रकाश हुक्केरी विरूद्ध भाजपचे आण्णासाहेब ज्वोल्ले यांच्यातच रंगणार आहे. आठवडाभराचा कालावधी मतदानास शिल्लक असल्याने कमी वेळेत मतदारापर्यंत पोहोचण्यास दोन्ही पक्षांत चढाओढ सुरू आहे.
कडोली (ता. बेळगाव) ते ऐगणी (ता.अथणी) असा लांब पल्ल्याचा अंतर असणाऱ्या क्षेत्रात ८ विधानसभेचे कार्यक्षेत्र आहेत. त्यात भाजप व काँगे्रस प्रत्येकी ४ समसमान पक्षीय बलाबल आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत काँगे्रसचे प्रकाश हुक्केरी यांनी भाजपचे रमेश कत्ती यांचा ३००३ मतांनी पराभव केला होता. सन २००९ पासून हा मतदारसंघ राखीव प्रभागातून जनरल झाल्याने ‘खासदार’कीसाठी इच्छुकांत वाढ झाली.
सन २००४ मध्ये विधानसभा निवडणुकीत प्रकाश हुक्केरी यांनी तर २०१३ मध्ये गणेश हुक्केरी या पिता पुत्रांनी भाजपच्या ज्वोल्लेंना पराभवाची चव चाखायला लावली आहे. मात्र, सध्या संबंधितांच्या घरी एक-एक आमदारही (गणेश हुक्केरी-चिक्कोडी, शशिकला ज्वोल्ले-निपाणी) असल्याने या निवडणुकीत ‘खासदारकी’साठी दोघांनीही प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
मतदारसंघात एकूण १५,७९३०९ मतदार आहेत. प्रमुख लढत हुक्केरी व ज्वोल्ले यांच्यात असून दोघे लिंगायत धर्माचे आहेत. या मतदारसंघात लिंगायत मतदारांची संख्या अधिक असल्याने मतविभागणी होण्याची शक्यता अधिक आहे. काँगे्रसची मतदार दलित अल्पसंख्याक तर कर्नाटकात लिंगायतांची मते भाजपची व्होटबँक मानली
जाते.
अशावेळी मराठा समाजाची २ लाख १२ हजार मते कुणाकडे जाणार यावर विजयाचे चित्र ठरणार
आहे.
बहुचर्चित भाजपची उमेदवारी मिळविण्यात आण्णासाहेब ज्वोल्लेंनी बाजी मारली असली तरी याच उमेदवारीवरून भाजपच्या गोटात अंतर्गत असंतोष वाढला आहे. याउलट खासदार हुक्केरी हे चिक्कोडी भाग वगळता ५ वर्षांत लोकसंपर्क ठेवण्यात अपयशी ठरल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे काही ठिकाणी रोषाला सामोरे जावे लागणार आहे. एकंदरीत कोणाला निवडून आणण्याऐवजी नेमके कोणाला पाडायचे याची दबक्या आवाजात चर्चा रंगल्याने यामुळे पक्षाऐवजी व्यक्तिनिष्ठ राजकारण महत्त्वाचे ठरणार आहे.
चिक्कोडीचे
आजपर्यंतचे खासदार
४१९५७ - दत्ता कट्टी (रिपब्लिकन)
४१९६२ - व्ही. एल. पाटील (काँगे्रस)
४१९६७-१९९५- बी. शंकरानंद (काँगे्रस)
४१९९६ - श्रीमती रत्नमाला शावनूर
(जनता दल)
४१९९८- रमेश जिगजिनगी (लोकशक्ती)
४१९९९- रमेश जिगजिगी (निधर्मी जनता दल)
४२००४ - रमेश जिगजिनगी (भाजपा)
४२००९ - रमेश कत्ती (भाजपा)
४२०१४ - प्रकाश हुक्केरी (काँगे्रस)
सलग २८ वर्षे खासदारकी
१९६७ ते १९९५ मध्ये झालेल्या लोकसभेच्या ७ निवडणुकीत विजय मिळवून सलग २८ वर्षे चिक्कोडीची खासदारकी भूषविण्याचा मान काँगे्रसचे बी. शंकरानंद यांना जातो. त्यांच्या कार्याची दखल घेवून पक्षाने त्यांना केंद्रीय मंत्रीपदही दिले होते.