Lok Sabha Election 2019 उमेदवारी, प्रचारातही साखरसम्राटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:11 AM2019-04-11T00:11:58+5:302019-04-11T00:12:16+5:30

नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : साखरपट्टा म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर मतदारसंघातील दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार साखर कारखानदारच ...

Lok Sabha Election 2019, in the election campaign, also the sugar mills | Lok Sabha Election 2019 उमेदवारी, प्रचारातही साखरसम्राटच

Lok Sabha Election 2019 उमेदवारी, प्रचारातही साखरसम्राटच

Next

नसिम सनदी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : साखरपट्टा म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर मतदारसंघातील दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार साखर कारखानदारच आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व प्रचारयंत्रणांसह राबणारेही साखरसम्राटच आहेत. आजच्या घडीला मतदारसंघातील नऊ कारखान्यांनी भूमिका स्पष्ट केली असून, त्यांपैकी चौघांची कुमक युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना, तर उर्वरित पाच कारखानदारांची कुमक महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे दिसत आहे. अजून काही कारखानदारांची भूमिका गुलदस्त्यातच आहे. कारखानदारांमध्येच सामना होत असला, तरी साखर उद्योगाविषयीचे प्रश्न मात्र या दोघांनीही दुर्लक्ष केले असून, वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या उडालेल्या राळेत ऊस उत्पादकांचे दुखणेच विस्मृतीत गेले आहे.
साखर कारखाने हे राजकारणाचे अड्डे झाल्याच्या टीका कितीही झाल्या, तरी अजूनही कारखाना केंद्रबिंदू मानून राजकीय समीकरणांची मांडणी होताना
दिसते.
कारखान्यातील यंत्रणा थेटपणे सक्रिय प्रचारात उतरविली जाते. कामगारांबरोबरच स्वत: कारखानदार, संचालक उमेदवारांच्या व्यासपीठावर सर्रासपणे वावरताना दिसतात. कोल्हापुरात सहकारी साखर कारखान्यांची संख्या जास्त असल्याने, तर सभासद हे कार्यकर्ते म्हणूनच काम करताना आढळतात.
कोल्हापुरात समोरासमोर उभे ठाकलेले प्रा. संजय मंडलिक व खासदार धनंजय महाडिक हे दोघेही साखर कारखानदार आहेत. प्रा. मंडलिक हे हमीदवाडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, तर खासदार महाडिक हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.
कोल्हापूर लोकसभेअंतर्गत कागल, राधानगरी-भुदरगड, चंदगड, करवीर, दक्षिण, उत्तर अशा सहा मतदारसंघांत १३ कारखाने येतात. त्यांपैकी आतापर्यंत १0 कारखान्यांनी भूमिका जाहीर केली आहे, तर उर्वरित तीन कारखान्यांची भूमिका ठरलेली नाही. गडहिंग्लज कारखान्याचे चेअरमन श्रीपतराव शिंदे यांनी अजून भूमिका जाहीर केलेली नाही. हेमरस, इकोकेन, फराळे हे खासगी कारखाने आहेत.
हातकणंगलेतही कारखानदारांचेच वर्चस्व

ऊसदर आंदोलनाच्या माध्यमातून साखर कारखानदारांशी दरवर्षी दोन हात करणारे खासदार राजू शेट्टी हातकणंगलेतून तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात आहेत. आतापर्यंत एकाकी झुंज देणाऱ्या शेट्टींना यावेळी मात्र सुरुवातीपासून कारखानदारांचे बळ मिळत आहे. यात आवाडे यांचा जवाहर-हुपरी, यड्रावकर यांचा शरद-नरंदे आणि गणपतराव पाटील यांचा दत्त-शिरोळ, बांबवडेच्या मानसिंग गायकवड यांच्या कारखान्याचा समावेश आहे. तसेच इस्लामपुरातून जयंत पाटील यांचे बळ पहिल्यांदाच मिळाले आहे. ‘वारणे’चे विनय कोरे यांची भूमिका अजून ठरलेली नाही. याउलट विरोधी उमेदवार धैर्यशील माने यांना वाळव्याच्या हुतात्मा कारखान्याचे बळ मिळाले आहे. ‘गुरुदत्त’च्या माधवराव घाटगे यांनी अजून भूमिका उघड केलेली नाही.

Web Title: Lok Sabha Election 2019, in the election campaign, also the sugar mills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.