Lok Sabha Election 2019 : धनंजय महाडिक यांचा साध्या पद्धतीने अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 05:10 PM2019-04-01T17:10:48+5:302019-04-01T17:13:51+5:30
राष्ट्रवादी आघाडीचे कोल्हापूर मतदारसंघातील उमेदवार धनंजय महाडिक यांनी सोमवारी साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला,
कोल्हापूर : कॉँग्रेस पक्षाने नेहमीच आघाडी धर्माचे पालन केले असून, यावेळेलाही धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीच्या पुढे कॉँग्रेस असेल, अशी ग्वाही कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी आघाडीचे कोल्हापूर मतदारसंघातील उमेदवार धनंजय महाडिक यांनी सोमवारी साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात आठ हजार कोटींपेक्षा अधिक निधी खेचून आणला.
या कामांच्या शिदोरीवर लोकांच्या समोर जात आहे. आमदार हसन मुश्रीफ, राजू शेट्टी, पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे यांच्यासह दोन्ही कॉँग्रेस, मित्रपक्षांचे नेते व कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याने विजयात कोणतीच अडचण येणार नाही.
दरम्यान, महाडिक यांनी मोजक्याच नेत्यांसमवेत येऊन सोमवारी दुपारी एक वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. पहिला अर्ज आमदार संध्यादेवी कुपेकर, महापौर सरिता मोरे, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, प्रा. जयंत पाटील व भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे दाखल केला.
खासदार राजू शेट्टी, आमदार हसन मुश्रीफ, पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे यांच्यासोबत धनंजय महाडिक यांनी दुसरा अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, पृथ्वीराज महाडिक, भगवान काटे, आदी उपस्थित होते.
शेट्टींचे वेटिंग!
महाडिक, मुश्रीफ यांच्यासह कॉँग्रेसचे नेते बरोबर एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात हजर होते, पण खासदार राजू शेट्टी वेळेत आले नाहीत. महाडिक सातत्याने त्यांना फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, पण वाटेत आहे एवढाच निरोप मिळत असल्याने महाडिक काहीसे अस्वस्थ झाल्याचे दिसत होते.
अखेर शेट्टी येत नसतील तर संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांना बोलवा, असे महाडिक यांनी सांगितले. अर्धा तासाच्या प्रतीक्षेनंतर शेट्टी दाखल झाले आणि महाडिक यांचा जीव भांड्यात पडला.
‘बास्केट ब्रीज’मुळेच शेट्टींना वेळ
दोन्ही कॉँग्रेसचे नेते शेट्टींची वाट पहात जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात थांबले होते. प्रत्येकजण शेट्टी येणार आहेत का? अशी विचारणा महाडिक यांना करत होते. त्यातील एका नेत्याने बास्केट ब्रीजमुळेच शेट्टींना वेळ होत असल्याची कोपरखळी हाणल्याने एकच हशा पिकला.
‘सतेज’ यांची भेट २४ मे नंतरच
तुमचे मित्र अर्ज दाखल करण्यास येणार आहेत का? अशी विचारणा पत्रकारांनी हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. मित्राची (सतेज पाटील) भेट आता नाही, २४ मे नंतरच त्यांना भेटणार, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
‘जनसुराज्य’चाही पाठिंबा
महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रा. जयंत पाटील आले होते. त्यांच्याकडे बघत मुश्रीफ म्हणाले, जयंत पाटील सर आल्याने धनंजय महाडिक यांना जनसुराज्य पक्षाचाही पाठिंबा आहे.