Lok Sabha Election 2019 गर्दी चांगली; परंतु विजयी आत्मविश्वासाचे काय..? : तब्बल १७ भाषणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 08:00 PM2019-04-18T20:00:18+5:302019-04-18T20:03:14+5:30
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी बुधवारी रात्री गांधी मैदानावर झालेली प्रचारसभा जंगी झाली; परंतु त्या गर्दीला चेतवून त्यांच्यात विजयाचा आत्मविश्वास निर्माण करण्यात नेत्यांना अपयश आले. रात्रीची सभा असताना व लोक लवकर आलेले
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी बुधवारी रात्री गांधी मैदानावर झालेली प्रचारसभा जंगी झाली; परंतु त्या गर्दीला चेतवून त्यांच्यात विजयाचा आत्मविश्वास निर्माण करण्यात नेत्यांना अपयश आले. रात्रीची सभा असताना व लोक लवकर आलेले असताना त्याच-त्याच त्याच तब्बल १७ भाषणांची जंत्री सुरू राहिली. त्याचा परिणाम म्हणून शरद पवार बोलायला उभे राहिल्यावर मैदानातून लोक निघून गेले. विशेष म्हणजे विरोधी उमेदवारांवरही मोजक्याच नेत्यांनी टीका केली.
राष्ट्रवादीचा अखेरचा टोला म्हणून या सभेकडे पाहिले गेले. मुळात या सभेला काँग्रेसचाही किमान राज्यस्तरीय एखादा नेता आणण्याचे प्रयत्न होते; परंतु ते घडले नाही; कारण काँग्रेसचे नेते आपापल्या मतदारसंघातच अडकून पडले आहेत. भाजप-शिवसेनेने त्यांच्या राज्यातील प्रचाराचा नारळ तपोवन मैदानावर विराट सभा घेऊन फोडला. त्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठीच या सभेचे आयोजन करण्यात आले.
माणसे सभेला खेचून आणण्यात पक्ष व स्वतंत्र महाडिक यांची यंत्रणा यशस्वी झाली. त्यामुळे मैदान चौफेर भरले होते. एवढ्या मोठ्या समुदायासमोर भाषणांचा क्रम हा कार्यकर्त्यांना चेतवणारा हवा होता; परंतु सगळ्यांना बोलण्याची संधी देण्याच्या नादात रटाळ भाषणे लांबली. पवार यांनीही जास्तीत जास्त तीनच भाषणे ठेवावीत, अशा सूचना केल्या होत्या; परंतु काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांना बोलायला दिले आणि पी. एन. पाटील यांना संधी दिली नाही तर त्यातून चुकीचा संदेश जातो अशी कोंडी पक्ष व उमेदवाराची झाली. त्यात काहींनी मी पवारसाहेब व्यासपीठावर आल्यावरच बोलणार, असाही आग्रह धरला. त्यामुळे एक-दोन नव्हे तर तब्बल १७ भाषणे झाली; परंतु ती रंगली नाहीत. स्वत: उमेदवार खासदार महाडिक हे भावनिक झाले. केलेल्या चांगल्या कामाची उतराई म्हणून पुन्हा एकदा संधी द्या, असे त्यांनी आवाहन केले.
पवार यांचे बुधवारचे भाषण ऐकल्यावर राष्ट्रवादीच्याच अनेक कार्यकर्त्यांना २००४ च्या त्यांच्या बिंदू चौकातील भाषणाची आठवण झाली. ‘राष्ट्रवादी’चे सदाशिवराव मंडलिक विरुद्ध शिवसेनेचे धनंजय महाडिक या निकराच्या लढतीत कोल्हापूरची सीट गेली, असे त्यावेळी वातावरण झाले होते. म्हणून पवार यांचा भीमटोला म्हणून बिंदू चौकात सभा झाली. त्या सभेत पवार यांनी याच महाडिक यांना ‘कौन है यह मुन्ना..?’ असा प्रश्न विचारल्यावर सभेत उपस्थित असलेल्या अनेकांच्या अंगावर शहारे उमटले होते. पवार यांचे ते भाषण कार्यकर्त्यांना एवढे चार्ज करून गेले की, लढतीचा निकालच बदलला. इतके आक्रमक बोलणे पवार यांना या वयात शक्य नाही; परंतु तरीही कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी जी ऊर्जा सभेतील भाषणांतून मिळायला हवी, ती फारशी मिळाली नाही. बहुतेक वक्त्यांनी विरोधी उमेदवार संजय मंडलिक यांच्यावर फारसा राजकीय हल्ला केलाच नाही. महाडिक, जोगेंद्र कवाडे आणि ‘स्वाभिमानी’चे अजित पोवार व खोत यांनीच मंडलिक यांच्यावर टीका केली. इतरांनी मोदी यांच्यावरच टीकेचा भडिमार केला. त्यातही अनेकांनी सोईची भूमिका घेतली.
मंडलिक हा शब्दच विसरले...
हसन मुश्रीफ यांनी महाडिक यांच्यासाठी हाडाची काडं व रक्ताचे पाणी करण्याची ग्वाही कागल स्टाईलने दिली; परंतु गंमत अशी की, मुश्रीफ यांनी या पूर्ण निवडणुकीत मंडलिक या शब्दाचाही साधा कधी उल्लेख केलेला नाही; तिथे उमेदवारावर टीका करायचे लांबच...!
मोदी आणि पवार
महाराष्ट्रात भाजपला पोषक हवा नसल्यानेच पंतप्रधानांसारख्या नेत्याला वारंवार या राज्यात यावे लागते, अशी टीका परवाच पवार यांनी पत्रकार परिषदेत केली होती. मग याच न्यायाने पवार हे वारंवार कोल्हापूरला तर आले नसतील का, अशीही विचारणा आता कार्यकर्त्यांतून होऊ लागली आहे.