Lok Sabha Election 2019 कडक उन्हात, प्रचार तापला ! उद्या सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:52 AM2019-04-20T00:52:29+5:302019-04-20T00:52:44+5:30
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार उद्या, रविवारी सायंकाळी बंद होणार आहे. त्यामुळे अखेरच्या दोन दिवसांत प्रचाराचा धुरळा उडविण्याचे ...
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार उद्या, रविवारी सायंकाळी बंद होणार आहे. त्यामुळे अखेरच्या दोन दिवसांत प्रचाराचा धुरळा उडविण्याचे नियोजन राजकीय पक्षांकडून केले आहे. प्रचारफेऱ्या, गाठीभेटी, जोडण्या आणि जाहीर सभांच्या माध्यमातून हवा करण्याचा प्रयत्न असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी गेले पंधरा-वीस दिवसांपासून कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांत धुरळा उडाला आहे. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत थेट दुरंगी लढत होत असल्याने प्रचारातही कमालीची ईर्षा पाहावयास मिळत आहे. दोन्ही बाजूंनी प्रचाराच्या माध्यमातून एकमेकांची उणीदुणी काढण्याची एकही संधी सोडलेली नाही. मंगळवारी (दि. २३) दोन्ही मतदारसंघांत मतदान होत असून त्यासाठीचा जाहीर प्रचार उद्या, सायंकाळी सहा वाजता बंद करावा लागणार आहे. दोन दिवस मिळणार असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्याची धावपळ करावी लागणार आहे. या अगोदर जरी प्रचाराचे एक-दोन टप्पे झाले असले तरी शेवटी मतदारांना भेटण्यासाठी उमेदवारांची धडपड असते. गावागावांत पदयात्रा काढून हवा करण्याची जबाबदारी उमेदवारांनी स्थानिक नेत्यांवर दिली आहे.
पालकमंत्र्यांचे आज सहा मेळावे
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आज, शनिवारी शहरात विविध ठिकाणी सहा मेळाव्यांचे आयोजन केले आहे.
शनिवारी सकाळी ९ वाजता राजारामपुरी मुख्य रस्त्यावर पदयात्रा होणार असून, १0 वाजता स्वयंवर मंगल कार्यालय बेलबाग मंगळवार पेठ, ११ वाजता लोळगे लॉन फिरंगाईजवळ वाजता इंद्रायणी सांस्कृतिक हॉल रंकाळा टॉवरजवळ, दुपारी १ वाजता नष्टे मंगल कार्यालय, महावीर गार्डन जवळ, २ वाजता त्र्यंबोली मंगल कार्यालय, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजसमोर, सदर बझार या ठिकाणी मंडलनिहाय हे मेळावे होणार आहेत.
शेवटच्या जोडण्यांसाठी टोकाचे प्रयत्न
लोकसभा निवडणुकीत चुरस अनेक वेळा आपण पाहिली; पण इतकी ईर्षा कधीच नव्हती. काठावरची लढत असल्याने शेवटच्या टप्प्यात जोडण्यांसाठी दोन्ही बाजूंनी टोकाचे प्रयत्न सुरू आहेत.
सोशल मीडियाच्या हत्याराला ‘धार’
या निवडणुकीत जाहीर सभांतील आरोप-प्रत्यारोपांबरोबरच सोशल मीडियातून एकमेकांवर वार करण्याची एकही संधी उमेदवारांनी सोडलेली नाही. शेवटच्या टप्प्यात या माध्यमाचा प्रभावी ‘हत्यार’ म्हणून वापर करण्याची व्यूहरचना आखली आहे. यासाठी उमेदवारांचे स्वतंत्र पथक असून एकमेकांच्या कच्च्या दुव्यांवर बोट ठेवत मतदारांत संभ्रम व बदनामी करून मत परिवर्तनाची यंत्रणा जोरात कामाला लागली आहे. जाहीर प्रचार जरी बंद झाला तरी मतदानापर्यंत हे ‘हत्यार’ उमेदवारांच्या हातात असल्याने त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.