Lok Sabha Election 2019 : प्रचार लोकसभेचा पेरणी विधानसभेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:41 AM2019-03-26T11:41:31+5:302019-03-26T11:43:20+5:30
राजाराम लोंढे कोल्हापूर : जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांत प्रचाराने गती घेतली असून सभांच्या माध्यमातून वातावरणनिर्मितीही सुरू झाली आहे. लोकसभेच्या ...
राजाराम लोंढे
कोल्हापूर : जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांत प्रचाराने गती घेतली असून सभांच्या माध्यमातून वातावरणनिर्मितीही सुरू झाली आहे. लोकसभेच्या रिंगणातील उमेदवार ताकदीने प्रचारात उतरले आहेतच, पण विद्यमान आमदारांसह इच्छुकांनी या प्रचारातून विधानसभेची पेरणी सुरू केली आहे. पावसाळा संपताच विधानसभेचे बिगुल वाजणार असल्याने प्रचारावर मर्यादा येणार आहेत. त्यामुळे आतापासूनच मतदारसंघात वातावरणनिर्मिती करून लोकांच्या मनावर चिन्ह बिंबवण्याची संधी मिळाली आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शमते न शमते तीच विधानसभेची तयारी सुरू होणार आहे. २३ मेला लोकसभेचा निकाल लागून मे महिन्याच्या अखेरीस केंद्रातील सरकार सत्तेवर बसेल. महिन्याभरात विधानसभेची तयारी सुरू होईल आणि साधारणता आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभेची आचारसंहिता लागेल.
आपल्याकडे तीन महिने जोरदार पाऊस असल्याने प्रचारयंत्रणेवर मर्यादा येतात. ‘घर टू घर’ संपर्क ठेवता येत नाही, विशेषत: दुर्गम वाड्या-वस्त्यांवर राबता ठेवता येत नाही. त्यामुळे लोकसभेच्या प्रचाराच्या माध्यमातून आतापासूनच संपर्क ठेवला तर पुढे थोडे सोपे जाईल, असा व्होरा असल्याने विद्यमान आमदारांसह इच्छुकांनी मतदारांपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाचे ‘चिन्ह’ मतदारांपर्यंत पोहोचवण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, सत्यजित पाटील, उल्हास पाटील, सुजित मिणचेकर या शिवसेनेच्या तर हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर या राष्ट्रवादीच्या आमदारांची ही रंगत तालीमच राहणार आहे. थेट पक्षाचे चिन्ह घेऊन ही मंडळी लोकांसमोर जाणार असल्याने येथे कोण किती पाण्यात आहे, याचा अंदाज येणार आहे तर सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, शिवाजीराव नाईक, जयंत पाटील यांचे सध्याचे प्रचाराचे चिन्ह आणि विधानसभेचे वेगळे असल्याने केवळ संपर्क हाच त्यांचा फायदा होणार आहे.
या संपर्क मोहिमेचा फायदा उठवण्यासाठी याच मतदारसंघांतील विरोधी इच्छुकांनीही कंबर कसली आहे; पण मित्रपक्षाच्या उमेदवाराचे चिन्ह एक आणि आपले विधानसभेचे चिन्ह दुसरे, असे त्रांगडे पी. एन. पाटील, सतेज पाटील, भरमूअण्णा पाटील, राजू आवाळे, राजीव आवळे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनय कोरे, मानसिंगराव नाईक, प्रकाश आवाडे यांचे झाले आहे तर के. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांना चिन्ह पोहोचवण्याची चांगली संधी मिळाली आहे.
यांना होणार थेट फायदा- चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, सत्यजित पाटील-सरूडकर, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर.
यांचे झाले त्रांगडे - सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, जयंत पाटील, शिवाजीराव नाईक, पी. एन. पाटील, सतेज पाटील, भरमूअण्णा पाटील, राजू आवाळे, राजीव आवळे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनय कोरे, मानसिंगराव नाईक, प्रकाश आवाडे.