Lok Sabha Election 2019 : आघाडी धर्म पाळावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे जिल्हाध्यक्षांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 10:57 AM2019-03-22T10:57:26+5:302019-03-22T11:01:19+5:30
काँग्रेस व राष्ट्रवादीची राज्यात आघाडी झाली असल्याने पक्षनेते व कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळून आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात उतरावे, अशा आशयाचे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना पाठविले आहे. या पत्राबरोबरच प्रचार समन्वयकांच्या नियुक्तीचे पत्र पाठविण्यात आले आहे.
कोल्हापूर : काँग्रेस व राष्ट्रवादीची राज्यात आघाडी झाली असल्याने पक्षनेते व कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळून आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात उतरावे, अशा आशयाचे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना पाठविले आहे. या पत्राबरोबरच प्रचार समन्वयकांच्या नियुक्तीचे पत्र पाठविण्यात आले आहे.
कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी आमदार संग्राम थोपटे यांची प्रचार समन्वयक म्हणून नियुक्ती झाली आहे. हे पत्र हातात पडल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेस सक्रिय झाली असून, समन्वयकांच्या नेतृत्वाखाली येत्या सोमवारी (दि. २५) आघाडीची एकत्रित बैठक घेतली जाणार आहे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी सांगितले.
गुरुवारी दुपारी आवाडे हे काँग्रेस कमिटीत आले होते. प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, आवाडे यांनी प्रदेशाध्यक्षांच्या सूचना व समन्वयक याची माहिती दिली. कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेचा प्रचार करीत असल्याची ‘प्रदेश’ने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षांनी पत्र पाठवून आघाडी धर्म पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात असल्याचेही आवाडे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीकडून अधिकृत निरोपाची वाट पाहतोय
प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार प्रचारात सक्रिय होत असलो तरी अजूनही राष्ट्रवादीकडून अधिकृत निरोप आला नसल्याची कबुलीही आवाडे यांनी दिली. अधिकृत निरोपाची आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली. राष्ट्रवादीला सोमवारच्या बैठकीचा निरोप देण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद आलेला नाही, असे आवाडे यांनी सांगितले.
आठवडाभरात यंत्रणा गतिमान होणार
सध्या प्रचारात शिथिलता दिसत असली तरी आठवडाभरात सर्व यंत्रणा गतिमान होणार आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच घडामोडी वाढणार आहेत. दोन्ही काँग्रेससह घटकपक्षांचे नेते सक्रिय होतील, अशा जोडण्या लावण्यात येत आहेत. नेत्यांतील वाद लवकर मिटावेत यासाठी मी स्वत: आग्रही आहे, असे आवाडे यांनी स्पष्ट केले.
आमदार सतेज पाटील व आवाडे बैठक
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याविरोधात प्रचार करीत असल्याच्या मुद्द्यावरून सध्या राज्यभर पडसाद उमटत आहेत. हे लोण इतरत्र पसरू नये याची दक्षता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार पाटील यांच्याशी बोलून यातून मार्ग काढण्यासाठी स्वत: जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी पुढाकार घेतला आहे.
बुधवारी या संदर्भातच आवाडे व पाटील यांची बैठक झाली आहे. बैठकीतील तपशिलाबाबत दोन्हींकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे; तथापि पाटील यांची समजूत काढण्यात आवाडे यांना यश आल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी समन्वयक आमदार थोपटे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आघाडीच्या एकत्रित बैठकीतच याबाबतची घोषणा होणार आहे.