Lok Sabha Election 2019 जागा मिळाली नाही तरी आघाडीसोबतच : राजू शेट्टी यांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 01:17 AM2019-03-27T01:17:37+5:302019-03-27T01:18:16+5:30
काँग्रेस आघाडीसोबतच जागावाटपाचा तिढा सुटला नाही तरी स्वबळावर लढूच; पण आघाडीला मदत करण्याची आणि युतीला विरोध करण्याची भूमिका आहे, असे खासदार
इचलकरंजी : काँग्रेस आघाडीसोबतच जागावाटपाचा तिढा सुटला नाही तरी स्वबळावर लढूच; पण आघाडीला मदत करण्याची आणि युतीला विरोध करण्याची भूमिका आहे, असे खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
देशभरात फिरून शेतकरी हिताचे काम करणारे २१ पक्ष व संघटना एकत्रित आणून दिल्लीत आंदोलन केले व त्यातूनच भाजपविरोधात महाआघाडीचा जन्म झाला असे सांगून शेट्टी म्हणाले, ‘आम्ही राज्यात १५ जागा लढायची तयारी केली होती परंतू आघाडी धर्म पाळण्यासाठी तेरा जागा माघार घेतली. बुलडाण्यात येथे अर्ज भरताना रविकांत तूपकर हे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत होते. त्यामुळे काँग्रेस आघाडीने दोन जागा ‘स्वाभिमानी’ला द्याव्यात, अशी आमची मागणी होती. आम्ही त्यांना बुलढाणा, वर्धा किंवा सांगलीची जागा सुचविली. नंतर शिर्डीचाही पर्याय दिला; परंतु कोणती जागा द्यायची हा तिढा अजून सुटलेला नाही. सांगलीची जागा आम्ही सुचवली होती; परंतु त्यामागे वसंतदादा घराण्यावर अन्याय करावा, अशी आमची कधीच भावना नव्हती. कोणती जागा द्यावी हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही अजूनही आशावादी आहोत.
खासदार शेट्टी यांनी मंगळवारी त्यांचे गतवेळचे प्रतिस्पर्धी, काँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची भेट घेतली. आवाडे यांनी आघाडीच्या निर्णयानुसार शेट्टी यांना ताकदीने सहकार्य करू असा शब्द दिला. त्यानंतर शेट्टी यांनी काँग्रेस भवनला भेट दिली. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, प्रकाश सातपुते, राहुल आवाडे उपस्थित होते.
कोणतीही खळखळ न करता आणखी एक जागा द्या कोणत्याही प्रकारची खळखळ न करता सांगली किंवा शिर्डी येथील जागा ‘स्वाभिमानी’ला द्यावी, अशी अपेक्षा खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. ते म्हणाले, महाआघाडी अस्तित्वात येण्यापूर्वी ‘स्वाभिमानी’ने राज्यात पंधरा जागा लढविण्याची तयारी केली होती; पण आघाडी धर्म पाळण्यासाठी आम्ही तेरा ठिकाणी माघार घेतली. अगदी बुलडाणा येथे उमेदवारी अर्ज भरताना रविकांत तूपकर हे कॉँग्रेसच्या राजेंद्र शिंगणे यांच्याबरोबर होते. आता शिर्डी किंवा सांगली येथील एक जागा आघाडी धर्म पाळण्यासाठी कॉँग्रेसने निर्विवादपणे ‘स्वाभिमानी’ला दिली पाहिजे.
मुख्यमंत्र्यांना टोला युतीच्या कोल्हापुरातील प्रचारावेळी माझ्यावर चोराच्या आळंदीत सहभागी झाल्याची टीका झाली; पण त्या व्यासपीठावर शेतकऱ्यांना बुडविणारे कोण-कोण बसले होते, हे त्यांनी नीटपणे पाहावे. लुच्च्या लोकांतून मी लवकर बाहेर पडलो हेच बरे झाले, अशा लोकांना शॉक ट्रीटमेंट द्यायला हवी, असा टोला शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.