Lok Sabha Election 2019 कोणाची कुळं काढली, एका व्यासपीठावर सांगावं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:19 AM2019-04-12T00:19:14+5:302019-04-12T00:19:33+5:30
भारत चव्हाण/राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कुळं काढणे हा महाडिकांचा धंदा नाही. आम्ही कोणाची कुळं काढली, ...
भारत चव्हाण/राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कुळं काढणे हा महाडिकांचा धंदा नाही. आम्ही कोणाची कुळं काढली, कोणती कुळं काढली हे त्यांना माहीत असेल तर एका व्यासपीठावर येऊन सांगावं. एखादं उदाहरण द्यावं, असे आव्हान देतानाच, विरोधकांनी टीका करावी; पण ती व्यक्तिगत पातळीवर करू नये. ही निवडणूक देशाचे राजकारण ठरविणारी आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणावर बोलावे. वैयक्तिक टीका आणि अप्प्रचार टाळावा. राजकारणातील सभ्यता पाळावी, असा सल्ला खासदार धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत दिला.
बास्केट ब्रिजबद्दल प्राध्यापक उमेदवाराचं अज्ञान
प्राध्यापक विरोधकांचे ते अज्ञान आहे. एखाद्या कामाचे उद्घाटन झाल्यावर ते मंजूर झालंय असे मानलं जाणार आहे का? सातारा-कागल राष्टÑीय महामार्ग सहापदरी होत असल्याने हे बास्केट ब्रिजचे काम रेंगाळलेय. ३ मार्चला हे टेंडर निघणार होते, ९ मार्चपर्यंत ते लांबले. मी नितीन गडकरी, शरद पवार यांची तारीखही घेतली होती. तोपर्यंत आचारसंहिता लागू झाली आणि काम थांबले. ३७० कोटींचा हा प्रकल्प रात्रीत होणार नाही, त्याला थोडा वेळ लागणार आहे, त्यास अदृश्य ब्रिज म्हणणे योग्य नाही.
महादेवराव महाडिक
यांच्या भूमिकेचा फायदाच
महादेवराव महाडिक यांच्या वेगवेगळ्या भूमिकांचा आपणाला फटका बसत आहे काय? यावर महाडिक म्हणाले, अजिबात नाही. उलट मला मोठी मदत होते. त्यांचे नेटवर्क व वलय मोठे आहे. अनेक गावांत त्यांचे कार्यकर्ते आहेत. एखाद्याला मदत करायची नसते म्हणून ते काहीही कारणे सांगतात. लोक सांगतात त्याप्रमाणे आम्ही राजकारण व समाजकारणात वावरत असतो. त्यामुळे भविष्यात त्यांनी सांगितले तर संपूर्ण महाडिक कुटुंब एकाच पक्षात दिसेल.
प्रश्न : गेल्या पाच वर्षांत तुम्ही सातत्याने पक्षविरोधी भूमिका घेतलीय?
उत्तर : राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांना मदत करू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे; परंतु कोणाच्या विरोधातही काम केलेले नाही. त्याचा केवळ अप्प्रचार जास्त झाला. कोणाच्या विरोधात काम केले असेल तर त्यांनी तसे दाखवावे. खासदारकीला सगळ्यांनी मदत केली होती. त्यामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच मी पुढील निवडणुकीत अलिप्त राहिलो.
प्रश्न : सतेज पाटील यांच्या भूमिकेचा काही परिणाम होईल का?
उत्तर : माझ्या निवडणुकीवर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही; परंतु त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. मोदी सरकार हटविण्यासाठी शरद पवार व राहुल गांधी यांनी महाआघाडी केली; परंतु एका आमदाराने स्थानिक वैर काढणे योग्य नाही. त्यांनी थेट शिवसेनेच्या व्यासपीठावर जाऊन काम सुरू केले. कॉँग्रेसचे नगरसेवक तिकडे पाठविले. मला वाटतंय त्यांना भविष्यात निश्चित अडचणी येणार आहेत.
प्रश्न : सत्तेची अनेक पदे महाडिक कुटुंबात असल्याबद्दल नाराजी आहे?
उत्तर : गेल्या अनेक वर्षांपासून महाडिक परिवार समाजकारणात, राजकारणात आहे. महादेवराव असतील, नाना महाडिक असतील, अमल असेल, शौमिका असतील; ते लोकांची कामे करत आले आहेत. कॉँग्रेसमधून अमलना संधी मिळाली नाही म्हणून त्यांना भाजपकडून उभं राहावे लागले. लोक सांगतात त्याप्रमाणे आम्हाला भूमिका ठरवावी लागते. अनेक घराणी आहेत की त्यांच्या येथे अनेक पक्ष आहेत.
प्रश्न : महाडिक गटाच्या दोन मतदारसंघांत दोन भूमिका का..?
उत्तर : हातकणंगले मतदारसंघातील गैरसमज दूर झाले आहेत. शेट्टी यांच्या पाठीशी महाडिक परिवार ठामपणे आहे. ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्तेही सक्रिय आहेत.
प्रश्न : विरोधकांच्या टीका-टिप्पणीकडे तुम्ही कसे बघता?
उत्तर : मी कधीही वैयक्तिक टीका, आरोप केलेले नाहीत, यापुढे करणारही नाही. माझ्याकडे कामांची मोठी यादी आहे. महाडिक घराण्याला सामाजिक कार्याचा वारसा आहे. युवाशक्ती, भागीरथी संस्थेच्या माध्यमातून लोकचळवळ उभी करून एक चांगले संघटन केले आहे. त्यामुळे चांगल्या मुद्द्यांवर बोलण्यासारखे आमच्याकडे भरपूर आहे. विरोधकांनी काय काम केले ते त्यांनी सांगावे.