Lok Sabha Election 2019 :  प्रतीक पाटील फोडणार ‘स्वाभिमानी’च्या प्रचाराचा नारळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:30 AM2019-03-27T11:30:51+5:302019-03-27T11:33:47+5:30

सांगलीच्या उमेदवारीवरून काँग्रेसपासून दुरावलेल्या माजी मंत्री प्रतीक पाटील यांच्याच प्रमुख उपस्थितीत आज, बुधवारी ‘स्वाभिमानी’च्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. दुपारी तीन वाजता वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्रे या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावातून प्रचाराचा प्रारंभ होणार आहे. सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली असली तरी समाजातील चांगल्या लोकांना बळ देण्यासाठीच प्रचाराच्या प्रारंभाला जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Lok Sabha Election 2019 Pratik Patil will break the coconut campaign for 'Swabhimani' | Lok Sabha Election 2019 :  प्रतीक पाटील फोडणार ‘स्वाभिमानी’च्या प्रचाराचा नारळ

Lok Sabha Election 2019 :  प्रतीक पाटील फोडणार ‘स्वाभिमानी’च्या प्रचाराचा नारळ

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रतीक पाटील फोडणार ‘स्वाभिमानी’च्या प्रचाराचा नारळयेडेमच्ंिछद्रेतून आज प्रचार प्रारंभ : उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार

कोल्हापूर : सांगलीच्या उमेदवारीवरून काँग्रेसपासून दुरावलेल्या माजी मंत्री प्रतीक पाटील यांच्याच प्रमुख उपस्थितीत आज, बुधवारी ‘स्वाभिमानी’च्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. दुपारी तीन वाजता वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्रे या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावातून प्रचाराचा प्रारंभ होणार आहे. सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली असली तरी समाजातील चांगल्या लोकांना बळ देण्यासाठीच प्रचाराच्या प्रारंभाला जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी तिसऱ्यांदा लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. उद्या, गुरुवारी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तत्पूर्वी प्रचाराचा प्रारंभ मात्र येडेमच्छिंद्रे येथूनच करण्याचे नियोजन जाहीर केले होते. त्यानुसार मंगळवारी नियोजनाच्या संदर्भात बैठका झाल्या. स्वत: खासदार शेट्टी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या प्रारंभाच्या सभेला प्रतीक पाटील हेदेखील उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी शेट्टी यांनी दिलेल्या निरोपाला पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

हातकणंगलेनजीकचा मतदारसंघ म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगलीसाठी आग्रह धरला. महाआघाडीनेही ही जागा ‘स्वाभिमानी’ला देण्याची तयारी दर्शविली. त्यांच्याकडून सक्षम उमेदवाराची चाचपणी सुरू असतानाच ही जागा सोडण्यावरून वसंतदादा पाटील गटाने मेळावा घेऊन कॉँग्रेसच सोडण्याचा जाहीर केला. स्वत: प्रतीक पाटील यांनी राजकारणातून संन्यास घेणार असल्याचे तर विशाल पाटील यांनी बंडखोरी करण्याचे जाहीर केले.

या वादामुळे व्यथित झालेल्या खासदार शेट्टी यांनी ‘सांगलीसाठी आम्ही आग्रही आहोत; पण कुणाला दुखवायचे नाही. प्रतीक पाटील माझ्या खूप जवळचे आहेत,’ असे भाष्य केले. सांगली सोडण्याच्या बदल्यात शिर्डी घेण्याची आमची तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सांगलीच्या जागेवरून नाराजी सुरू असतानाच प्रचाराचा प्रारंभ मात्र एकत्रितच व्हावा असा आग्रह शेट्टी यांनी धरला. याला पाटील यांनीही चांगला प्रतिसाद देत आपल्या मुलासमवेत प्रचाराचा नारळ फोडण्यास येऊ, असे जाहीर केले.

विशाल पाटील यांनी ‘स्वाभिमानी’कडून निवडणूक लढवावी यासाठी ‘स्वाभिमानी’ने मंगळवारी दिवसभर आग्रह धरला; पण पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.

सतेज पाटील यांची शिष्टाई

सांगलीतील जागेवरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या नाराजीनाट्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी सहप्रभारी म्हणून नियुक्ती झालेल्या आमदार सतेज पाटील यांच्यावर आली आहे. मंगळवारी काँग्रेस कमिटीत बैठका घेऊन नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते.

शिर्डी लढविण्याची तयारी

सांगलीवरून काँग्रेसअंतर्गत मतभेदाची दरी रुंदावत चालल्याने शिर्डी मतदारसंघातून लढण्याची तयारी ‘स्वाभिमानी’ने केली आहे. येथून काँग्रेसने आधीच उमेदवारी जाहीर केली आहे. ती मागे घेऊन त्याऐवजी संतोष रोहम यांना उमेदवारी मिळावी, असा पर्याय ‘स्वाभिमानी’ने काँग्रेस नेत्यांसमोर ठेवला आहे. रोहम यांचे वडील आंबेडकर चळवळीशी निगडित होते. स्वत: रोहम हे शेतकरी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. विखे-पाटील गटास ते सक्षमपणे टक्कर देवू शकतात, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.
 

 

Web Title: Lok Sabha Election 2019 Pratik Patil will break the coconut campaign for 'Swabhimani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.